

कळवण (नाशिक) : तालुक्यातील वडाळा हतगड गावातील महिलांनी गावात भीषण पाणीटंचाई होत असल्याने आज कळवण पंचायत समितीवर पायी मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडले. गेल्या अनेक दिवसांपासून गावात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
सकाळीच महिलांनी एकत्र येत घोषणा देत मोर्चा सुरू केला. रिकामे हंडे घेत महिलांनी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना आपल्या व्यथा ऐकविल्या. वारंवार तक्रारी करूनही अद्याप पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही.
मोर्चाच्या नेतृत्वात गावातील महिला, स्वयंसहायता गटाच्या सदस्या आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते. महिलांनी पंचायत समिती अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर करत पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करावा अशी मागणी केली. पंचायत समिती अधिकाऱ्यांनी समस्या लक्षात घेतली असून लवकरच उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी आदिवासी रावण साम्राज्य संस्थापक विशाल जोपळे, भास्कर भोये, किरण गांगुर्डे, सुरेश गायकवाड, वैभव गायकवाड आदी उपस्थित होते.