

जानोरी (नाशिक) : दिंडोरी तालुक्यातील नळवाडपाडा येथे घराच्या छतावरील लोखंडी पाइपला शिकार पंप लावण्याच्या प्रयत्नात विजेचा धक्का बसून युवकाचा मृत्यू झाला. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या पत्नीलाही विजेचा धक्का बसल्याने तीही मरण पावली.
या घटनेविषयी मिळालेल्या माहितीनुसार, नळवाडपाडा येथील साहेबराव चंदर महाले (29) हे आपल्या कुटुंबासोबत वस्तीवर राहत होते. गुरुवारी (दि. 29) सकाळी आठच्या सुमारास त्यांनी घराच्या पडवीवरील लोखंडी पाइपला औषध मारण्याचा पंप ठेवण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने त्या पाइपमध्ये वीज प्रवाहित झालेली होती. विजेचा तीव्र झटका बसल्याने साहेबराव पाइपला चिकटले. हे पाहून त्यांची पत्नी राणी महाले (25) त्यांना वाचवण्यासाठी धावली, मात्र तिलाही जोरदार शॉक बसला. नातेवाईकांनी दोघांना तात्काळ दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, राणी महाले या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या. त्यांच्या पोटीचे बालकही या घटनेत मरण पावले. मयत दाम्पत्यांच्या पश्चात आई, भाऊ, तसेच चार वर्षांची एक मुलगी आणि अडीच वर्षांची दुसरी मुलगी असा परिवार आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.