

नाशिक : गत आठवड्यापासून अवकाळीने संपूर्ण राज्याला फटका दिल्यानंतरही अजन दोन दिवस हवामान विभागाने अवकाळीचा यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस अलर्टनुसार, नाशिक जिल्ह्यात वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून ताशी 40 ते 50 किमी वेगाने वाहण्याची शक्यता आहे.
वादळी वारे आणि तीव्र पावसामुळे गत आठ दिवसांपासून शेती, वाहतूक आणि जनजीवन प्रभावित झाले आहे. जिल्ह्यातील सुमारे तीन हजार 868 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. नाशिक, बागलाण, सुरगाणा, इगतपुरी, सिन्नर, देवळा आदी तालुके अवकाळीने प्रभावित झाले आहेत. शेती पिकांसह, आंबा, कांदा, डाळिंब, द्राक्षांसह काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
अवकाळीने पावसामुळे घरांचेही नुकसान झाले असून 300 हून अधिक घरांची पडझड झाली आहे. पेठ तालुक्यात सर्वाधिक 101 घरे बाधित झाली तर कळवणमध्ये 59, बागलाणमध्ये 22, मालेगावमध्ये 21 घरांचे नुकसान झाले. आज आणि उद्यापर्यंत अवकाळीचा मुक्काम वाढला आहे.