

नाशिक : गत तीन दिवसांपासून चाळीसच्या आसपास रेंगाळणार्या तापमानात शनिवारी (दि.19) 3 अंशाने घट झाली. तापमान 40 डिग्रीहून 37 डिग्रीपर्यंत खाली उतरले. त्यामुळे तापमान काहीसे कमी झाले असले तरी उकाडा कायम असल्याने नाशिककर उन्हाच्या झळांनी त्रस्त आहेत.
जिल्ह्यात 9 एप्रिल रोजी पार्याने 41.3 डिग्री सेल्सिअसचा टप्पा ओलांडल्याने वातावरण असह्य झाले होते. रस्ते सुनसान झाल्याने बाजारपेठाही थंडावल्या होत्या. नाशिककर सायंकाळी 5 नंतर घराबाहेर पडणे पसंत करत होते. उन्हाची लाहीलाही होत असल्याने थंडपेयाच्या गाड्यांवर गर्दी वाढतांना दिसत होती. मात्र रविवारी (दि.13) आणि सोमवारी (दि.14) अवकाळीने पश्चिम महाराष्ट्राला तडाखा देत शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. अवकाळीचा तडाखा अन ढगाळ हवामान यामुळे नाशिककडे वारे वाहू लागल्याने तापमानात घट होत गेली. 42 डिग्रीपर्यंत गेलेल्या तापमानात 35 डिग्रीपर्यंत घट आली.
शनिवारी (दि.12) किमान तापमान 20 डिग्री तर कमाल तापमान 35.4 डिग्री सेल्सिअसची नोंद करण्यात आली. रविवारी (दि.13) तापमानाने पुन्हा 38 डिग्रीपर्यंत उसळी गत आठवड्यात शुक्रवारी (दि.18) कमाल तापमानात पुन्हा एकदा 40 डिग्रीची सर्वाधिक नोंद करण्यात आली. शनिवारी (दि.19) तापमानात घसरण होऊन 37.3 डिग्रीपर्यंत तापमान खाली आहे. मात्र तरीही उकाडा कायम असल्याने नाशिककर त्रस्त आहेत. शहरातील वाढत्या चारचाकी वाहनसंख्या घरोघरी वाढणारी एअर कुलरची संख्या, कमी झालेली झाडांची संख्या, वाढते प्रदुषण यामुळेही तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे.
एप्रिलच्या मध्यावरच चाळीशी गाठल्याने मे महिन्यात तापमान किती उच्चांक गाठेल या भीतीनेच नाशिककरांची गाळण उडत आहे. सकाळी 9 वाजेपासून दुपारी पाचपर्यंत उन्हाच्या झळया सोसणे कठीण झाल्याने थंड पेयांच्या गाड्यांवर गर्दी वाढत आहे. गत आठवड्यात अवकाळीने येवला, चांदवड आणि निफाडला झोडपले परिणामी सिन्नरमध्ये कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. रविवारी (दि.13) दुपारी चारच्या सुमारास निफाड तालुक्यातील रानवड मंडळात जोरदार वार्यासह पावसाने हजेरी लावली तर चांदवड तालुक्यातील वडनेरला सहाच्या दरम्यान अवकाळीने जोरदार तडाखा दिला. येवला तालुक्यातील राजापूर, खिर्डी साठे परिसरालाही सायंकाळी सातच्या दरम्यान पावसाने झोडपले. परिणामी शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांत पुन्हा गारपिटीचा इशारा दिला आहे.