

नाशिक : ढगाळ हवामानामुळे शहरासह जिल्ह्यातील थंडी गायब झाली असून, तापमानात काहीशी वाढ झाली आहे. तापमान वाढल्याने अवकाळी पावसाने गुरुवारी (दि. 26) शहरात हजेरी लावली. रात्री आठच्या सुमारास मुंबई नाका परिसरात हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्या.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार शुक्रवारी (दि.27) जिल्ह्यात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाची शक्यता आहे. गेले काही दिवस कडाक्याची थंडी पडल्याचे पाहायला मिळत आहे. तर राज्यातील काही शहरांचे तापमान पाच अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते. परंतु दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. थंडी गायब होऊन तापमान वाढल्याने हवामानात उकाडा वाढला होता. गुरुवारी सायंकाळी शहरात पावसाचा शिडकावा झाला. ढगाळ हवामानासह अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक संकाटात सापडले आहेत. बागलाणच्या पट्ट्यातील द्राक्ष काढणीला आले आहेत. पावसामुळे द्राक्षमण्यांना तडे जाण्याची शक्यता असते. तसेच पाणी उतरलेल्या मण्यांना तडे जातात. त्यामुळे अवकाळीपासून द्राक्षबागांचे संरक्षण व्हावे, यादृष्टीने शेतकर्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
लाल कांद्याची टिकवण क्षमता आधीच कमी असते. खराब वातावरणात तो विक्रीसाठी दाखल झाल्यास व्यापारी दर कमी करतात. आवक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बाराशे ते अठराशे रुपये प्रतिक्विंटल दराने कांद्याची विक्री होत आहे. त्यात पावसाचे वातावरण म्हटल्यावर शेतकर्यांवर दुहेरी संकट कोसळण्याची भीती व्यक्त केली जाते. गव्हावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. ओंबी निघण्याच्या स्तरावर असलेल्या गव्हावर करपा रोग पडू शकतो, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.