

नाशिक : जोरदार पावसानंतर आता थंडीचा कडाकाही नाशिककरांना हुडहुडी भरवणारा ठरला आहे. सोमवारी(दि.१७) नाशिक शहरात पारा ९.६ अंश सेल्सिअसपर्यंत तर निफाडमध्ये ८.३ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला. चार दिवसात किमान तापमानात १.३ अंश सेल्सिअसची घसरण झाली आहे. येत्या काही दिवसात पारा आणखी घसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रवाह सुरूच आहे. त्यामूळे नाशिक शहरासह जिल्ह्यात सकाळसह दिवसभर गारठा जाणवतो आहे. उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात थंडीची लाट पसरली आहे. उर्वरीत महाराष्ट्रात देखील गारठा वाढण्याचा अंदाज वर्तविला जातो आहे. निफाडमध्ये रविवारी या हंगामातील निचांकी आठ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती तर नाशिकमधील किमान तापमान देखील १०.१ अंश सेल्सियस नोंदविले गेले होते. त्याआधी शुक्रवारी १०.९ अंश सेल्सियस तापमान नोंदविले गेले होते. म्हणजेच चार दिवसांत १.३ अंश सेल्सियसने तर २४ तासांत अर्धा अंश सेल्सियसने किमान तापमान घसरले आहे. किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सियसने घसरल्यास आणि तापमानात सरासरीपेक्षा ४.५ अंशांपेक्षा अधिक घट झाल्यास थंडीची लाट आली असे मानले जाते. नाशिक शहरात हंगामात पहिल्यांदाच दहा अंश सेल्सियपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली असून लाट अधिक तीव्र झाल्यास हे तापमान घसरत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.