

नाशिक : आठवडाभरापासून दडी मारुन बसलेला पाऊस पुन्हा परतला आहे. मात्र, दिवसभर उकाडा आणि सायंकाळी जोरदार पावसाच्या सरीमुळे अस्थिर वातावरण निर्माण झाले आहे. या बदलत्या हवामानाचा थेट परिणाम नागरी आरोग्यावर होत असून, सर्दी, खोकला आणि तापासारख्या संसर्गजन्य आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.
७ मेपासून सुरू झालेला पाऊस २७ मेपर्यंत सलग बरसत होता. २८ मे ते ४ जूनपर्यंत पावसाने काहीसी विश्रांती घेतली. हवेतील दाब वाढल्याने, पाऊस दडी मारून बसल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. दरम्यान, वातावरण पुन्हा एकदा मान्सून योग्य झाल्यानंतर बुधवारी (दि. ४) नाशिकला दोन दिवसांचा यलो अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार गुरुवारी (दि. ५) सायंकाळच्या सुमारास पावसाने शहर व परिसरात जोरदार हजेरी लावली होती. तासाभरातच तब्बल १६ मिमी पाऊस झाल्याने, नाशिकरोडसह अन्य भागातील रस्ते जलमय झाले होते. मात्र, यामुळे रात्रीच्या सुमारास वातावरणात उकाडा अनुभवयास मिळाला. पहाटेच्या सुमारास बोचरी थंडी अन् त्यानंतर पुन्हा उकाडा असे विचित्र वातावरण निर्माण झाले. दिवसभर आकाशात निरभ्र वातावरण निर्माण झाल्याने, सुर्य किरणांचा सामना करावा लागला. दुपारी ४ वाजेनंतर पुन्हा आकाशात ढगांनी गर्दी केल्याने, वातावरणात गारवा निर्माण झाला. तर ५ वाजेनंतर पाऊस बरसण्यास सुरुवात झाली.
नाक गळणे (सर्दी), शिंका, खोकला, थंडीवाजून ताप, कफ, घशात जळजळ, गिळताना त्रास, पंचनक्रिया मंदावणे, जुलाब, अशक्तपणा.
हवामानातील बदलामुळे सर्दी, ताप, खोकला यासारख्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. डास, बॅक्टेरिया, बुरशी यांना पोषक हवामानामुळे आरोग्यावर परिणाम होत असून, अशा रुग्णांनी त्वरित वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विचित्र वातावरणाचा सर्वाधिक त्रास लहानग्यांना होत आहे. सर्दी, ताप, खोकला, जुलाब या आजाराने लहानग्ये हैराण असून, पालकांनी त्यांची सक्रियपणे काळजी घेण्याची गरज आहे. मुलांना पुरेसे स्वच्छ पाणी पिण्यास द्यावे, जेणेकरून त्यांचे शरीर हायड्रेटेड राहील. अंगभर कपडे घालून डास आणि थंडीपासून संरक्षण द्यावे. सकस आहार, नियमित स्वच्छता याकडे विशेष लक्ष द्यावे. गरज पडल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून केले जात आहे.