

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहराचे तापमान महिन्याच्या प्रारंभी ३८ अंश सेल्सिअसवर गेल्यामुळे नाशिककरांना मार्चमध्येच TO 20 प्रखर उन्हाच्या झळा सोसाव्या लागल्या. मात्र, मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील काही भागांत गारपिटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
परिणामी कमाल आणि किमान तापमानात मोठी घट झाल्यामुळे उन्हाच्या झळांपासून नाशिककरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील मालेगाव, सटाणा, नांदगाव, कळवण, येवला, निफाड, सिन्नर, दिंडोरी या आठ तालुक्यांत गारपिटीसह अवकाळीने जोरदार हजेरी लावली.
त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, हवामान विभागाने पुढील दोन दिवस या भागात पुन्हा गारपिटीचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे. दरम्यान, गारपीटीमुळे कमाल तापमानात मोठी घट झाली असून, वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
तसेच किमान तापमानही १५ अंश सेल्सिअसवर आल्याने, सकाळच्या सुमारासदेखील थंड वातावरण अनुभवयास मिळत आहे. मागील काही दिवसांपासून नाशिकमध्ये उन्हाच्या झळा तीव्र झाल्या होत्या. त्यामुळे दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणे नाशिककरांकडून टाळले जात होते. आता वातावरणात गारवा निर्माण झाल्याने, नाशिककरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.