

नाशिक : शहर व जिल्ह्यात दोन दिवसांच्या ढगाळ हवामानानंतर थंडीचा जोर वाढणार असल्याने जिल्हावासीयांना हुडहुडी भरणार आहे. शहरात शनिवारी (दि. १६) पारा १६.८ अंश सेल्सियस नोंदविण्यात आला.
हिमालयात यंदाच्या हंगामातील पहिली बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे उत्तरेकडील राज्य गारठले असून, चालू आठवड्याच्या प्रारंभी नाशिकसह राज्यातील किमान तापमानाच्या पाऱ्यात सरासरी २ ते ३ अंशांची घसरण झाली होती. मात्र, पूर्वेच्या वाऱ्यांच्या प्रणालीमुळे दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. परिणामी गेल्या दोन दिवसांपासून राज्यात ढगाळ हवामान होते. दरम्यानच्या काळात काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. त्यामुळे वातावरणातून थंडी गायब झाली होती. पण, ढगाळ हवामान निवळले असून, पुढचे 10 दिवस आकाश निरभ्र असणार आहे. त्यामुळे नाशिकसह राज्यभरातून गायब झालेल्या थंडीचा कडाका पुन्हा एकदा वाढेल, असा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे.
चालू आठवड्याच्या प्रारंभी नाशिक जिल्ह्याच्या पाऱ्यात सातत्याने घसरण झाली. नाशिक शहराचा पारा १३.२ अंशांपर्यंत खाली आला हाेता, तर निफाडला ११.६ अंश एवढ्या कमी तापमानाची नोंद झाली. त्यानंतर ढगाळ हवामानामुळे दोन दिवस थंडी गायब झाली असली, तरी ती पुन्हा परतणार असल्याने गारठ्यात वाढ होणार आहे.