Nashik Water Tax | नाशिककरांच्या खिशाला कात्री! जलसंपदा विभागाकडून पाणीपट्टीत तब्बल 45 टक्क्यांची वाढ

Nashik Water Tax | जलसंपदाकडून महापालिकेच्या पाणीपट्टीच्या दरात 45 टक्के वाढ
Water
Water Pudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
विविध धरणांतून स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत उचलण्यात येणाऱ्या पाण्याच्या दरात जलसंपदा विभागाने तब्बल ४५ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. यामुळे आधीच तोट्यात असलेल्या नाशिक महापालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेवर वाढीव पाणीपट्टीपोटी वार्षिक १० ते १२ कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे. दरवाढीमुळे वाढणारा तोटा दूर करण्यासाठी महापालिकेकडून नाशिककरांवर पाणीपट्टी दरवाढ लागू केली जाण्याची शक्यता आहे.

Water
Nashik Malnourished Children | नाशिक जिल्ह्यात 3,672 बालके कुपोषित; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे निर्मूलनाचे कडक आदेश!

नाशिक शहराला प्रामुख्याने गंगापूर धरण, मुकणे धरण व काही प्रमाणात दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या पाणीपुरवठ्यासाठी गंगापूर धरण, मुकणे धरण येथे महापालिकेचे पंपिंग स्टेशन कार्यरत आहे. दारणा धरणाऐवजी चेहडी येथे दारणा नदीपात्रातून महापालिका पाणी उचलते.

या पाण्यावर जलशुद्धीकरण केंद्राद्वारे शुद्धीकरणाची प्रक्रिया करून जलवाहिन्यांद्वारे ते घरोघरी पोहोचविले जाते. धरणांची मालकी जलसंपदा विभागाकडे असल्याने धरणातून उचलण्यात येणाऱ्या पाण्यासाठी महापालिकेला जलसंपदा विभागाला पाणीपट्टी अदा करावी लागते. यासाठी जलसंपदा विभागाने दर निश्चित केले असून, टप्प्याटप्प्याने दरवाढ केली जात असते.

आतापर्यंत घरगुती वापराच्या पाणीपुरवठ्यासाठी जलसंपदा विभाग महापालिकेकडून दर हजार लिटरसाठी ०.५५ रुपये तर वाणिज्य वापरासाठी २.७५ रुपये दर आकारत होते. यात जलसंपदा विभागाने मोठी वाढ केली आहे. थेट धरणातून उचलण्यात येणाऱ्या घरगुती पाणीवापरासाठी प्रतिहजार लिटर दर ०.८० रुपये तर वाणिज्य वापरासाठी दर ४ रुपये करण्यात आले आहे.

घरगुती वापराच्या दरात ४५ टक्के तर वाणिज्य वापराच्या दरात २१ टक्के वाढ करण्यात आली आहे. तसेच दारणा नदीपात्रातून उचलण्यात येणाऱ्या पाण्यासाठी घरगुती वापरासाठी १.१० रुपयांवरून १.६० रुपये तर वाणिज्य वापरासाठी ५.५० रुपयांवरून ८ रुपये प्रति हजार लिटरसाठी दर आकारले जाणार आहेत.

Water
ICU NICU Safety Audit | अमरावती दुर्घटनेनंतर नाशिक प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; सर्व रुग्णालयांना फायर अन् इलेक्ट्रिकल ऑडिटचे आदेश!

जलसंपदा विभागाने केलेल्या या दरवाढीमुळे महापालिकेवर दरवर्षी १० ते १२ कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता महापालिकेने जलसंपदा विभागाला २५ कोटींची पाणीपट्टी भरली होती. २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी जलसंपदा विभागाने केलेल्या दरवाढीमुळे महापालिकेला पाणीपट्टी बिलापोटी सुमारे ३६ कोटी रुपये जलसंपदा विभागाला भरावे लागण्याची शक्यता आहे.


दररोज २०.८१ दलघफू पाणीपुरवठा

महापालिकेच्या माध्यमातून दररोज गंगापूर धरण, मुकणे धरण व दारणा नदीपात्रातून नाशिक शहराला २०.८१ दशलक्ष घनफूट अर्थात ५८९ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात आहे. यात गंगापूर धरणातून १४.७४ दलघफू, दारणातून १.०३ दलघफू तर मुकणे धरणातून ५.०५ दलघफू पाणीपुरवठा केला जात आहे. १५ ऑक्टोबर २०२५ ते ३१ जुलै २०२६ पर्यंत गंगापूर धरणातून ४६००, दारणा २०० तर मुकणे धरणातून १६०० अशा प्रकारे एकूण ६४०० घनफूट आरक्षित पाण्याचा वापर महापालिकेने केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news