Nashik Water Supply : हद्दीबाहेरील बांधकाम प्रकल्पांना पाणीपुरवठा

शहरात टंचाई असताना महासभेवर प्रस्ताव
water supply
पाणीपुरवठाpudhari
Published on
Updated on

नाशिक : धो-धो पाऊस कोसळत असताना पंचवटी, सिडको, सातपूरसह नाशिकरोड विभागातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना महापालिका हद्दीबाहेरील मोठ्या बांधकाम प्रकल्पांना पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेच्या मान्यतेसाठी सादर केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नाशिककरांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना प्रशासनाला गोवर्धन, वासळी ग्रामपंचायत हद्दीतील बांधकाम प्रकल्पांचा पुळका आल्याने नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण तुडूंब भरले असताना नागरिकांना मात्र कुत्रिम टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाविषयी नागरीकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. असे असताना आता ग्रामपंचायत हद्दीमधील तीन मोठ्या प्रकल्पांसाठी पाणीपुरवठ्याकरीता महासभेवर प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. यापूर्वी गोवर्धन व तिरडशेत येथील ग्रामपंचायत यांनी महापालिकेकडून पाणीपुरवठा व्हावा अशी मागणी केली होती. त्याचबरोबर काही खाजगी बांधकाम व्यवसायिकांनी देखील त्यांच्या गृहप्रकल्पांसाठी पाणीपुरवठ्याची मागणी केल्याने वाद निर्माण झाला होता. चांदशी शिवारात खाजगी बांधकाम व्यवसायांकडून नाशिक महापालिकेकडे पाण्याची मागणी करण्यात आली होती. विशेष म्हणजे स्वखर्चाने पाईपलाईन टाकण्याची देखील तयारी बांधकाम व्यवसायिकांनी केली. नाशिक रोड विभागातील वडनेर दुमाला व आसपासच्या ग्रामीण भागात निवासी प्रकल्प होऊ घातल्याने सन २०११ मध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मदतीने नाशिक रोड जलशुद्धीकरण केंद्रातून पाण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु प्रचंड विरोधामुळे ती मागणी फेटाळली गेली.

टंचाईची समस्या वाढणार

नाशिक शहराची लोकसंख्या वाढल्याने पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच आगामी सिंहस्थात देशभरातून येणाऱ्या साधु-महंत व भाविकांसाठी अधिक क्षमतेने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. आता महापालिका हद्दीबाहेरील बांधकाम प्रकल्पांसाठी पाणीपुरवठा केल्यास शहरातील टंचाईची समस्या अधिकच वाढणार आहे.

राजकीय पक्षांची चुप्पी

शहरातील पाणीप्रश्न गंभीर बनला असताना सत्ताधारी भाजप, शिवसेना(शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) तसेच विरोधक शिवसेना(उबाठा), राष्ट्रवादी (शरद पवार), मनसे आणि काँग्रेस पक्षाने चुप्पी साधली आहे. आता बांधकाम प्रकल्पांसाठी पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव सादर केल्याने राजकीय पक्षांकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news