

नाशिक : जिल्हा परिषदेने यंदाचा पाणीटंचाई आराखडा बनवला असून, आराखड्यानुसार जिल्ह्यातील ४२३ गावे आणि ६५२ वाड्यावस्त्यांना पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. भरघोस पाऊस झाला असला तरी, संभाव्य टंचाई दूर करण्यासाठी १६२ टँकरची आवश्यकता भासणार आहे. मार्चनंतर जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई निर्माण झाल्यास टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने ७ कोटी ३८ लाख २५ हजार रुपयांचा आराखडा प्रस्तावित केला आहे.
गतवर्षी फेब्रुवारीत अनेक गावांतून टँकरची मागणी करण्यात येत होती. यंदा, एकाही गावातून टँकरची मागणी अद्याप करण्यात आलेली नाही, असे प्रशासनाने सांगितले. साधारण ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसाचा अंदाज घेऊन, टंचाई कृती आराखडा तयार केला जातो. यंदाच्या वर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाने हजेरी लावली. धरणात मुबलक पाणीसाठा असून नद्या, नाले, बंधारे ओव्हरफ्लो झाली होती. त्यामुळे भरपूर पाणीसाठा झाला. पर्यायाने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टंचाई जाणवली नाही. जिल्हा परिषदेने जानेवारी महिन्यात टंचाई आराखडा अंतिम करत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यास मंजुरी दिली. गतवर्षीच्या तुलनेत टंचाई आराखड्यात घट झाली आहे. गत वर्षाच्या तुलनेत यंदा टँकरग्रस्त गावांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. गतवर्षी ७०० हून अधिक गावांत संभाव्य टंचाई होती. यंदा ती ४२३ वर आली आहे. तसेच, १ हजार वाड्यांऐवजी ६५२ वाड्यांत टंचाईची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
त्यासाठी १६२ टँकरची आवश्यकता लागणार आहे. पहिला टप्पा (ऑक्टोबर ते डिसेंबर) हा निरंक गेला आहे. दुसऱ्या टप्प्यात मार्च महिन्यापासून टँकरची मागणी होऊ शकते, असा अंदाज आहे. तिसऱ्या टप्प्यात टँकरची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या उन्हाच्या झळा वाढत असून, तापमान ३३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. परंतु, अद्याप एकाही टँकरची मागणी नोंदवण्यात आलेली नाही.
चुकीचा अंदाज
एकीकडे मेपर्यंत जिल्ह्यात अशी स्थिती होती. सप्टेंबरमध्ये जिल्ह्यात महापूर आला. हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाले. महापूर आल्याने यंदा टंचाईस्थिती निर्माण होणार नाही, असे अधिकाऱ्यांना वाटते. परंतु, मार्चनंतर संभाव्य दुष्काळ आणि पाणीटंचाई अधिक गडद रूप घेऊ शकते, असे शेतकऱ्यांना वाटते.
खासगी विहीर अधिग्रहण करणे - १.१७ कोटी
टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे - ६.३६ कोटी
बागलाण, चांदवड, दिंडोरी, इगतपुरी, कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, सिन्नर.