

देवळा (नाशिक) : तालुक्यातील भऊर येथे जल जीवन मिशनअंतर्गत करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या अपूर्ण व निकृष्ट दर्जाच्या कामामुळे गावात पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त महिलांनी बुधवार (दि.18) रोजी आज ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढत कार्यालयाला कुलूप ठोकले. तसेच, पाणी पुरवठा तातडीने सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ पवार यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 'हर घर नल' संकल्पनेअंतर्गत भऊर गावात जल जीवन मिशन योजनेचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, या कामात संबंधित ठेकेदाराकडून अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. योजनेच्या विहिरीमध्ये मुबलक पाणीसाठा असतानाही गावात नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना आहे. शिवाय, हे काम अद्याप अपूर्ण असून त्यामुळे योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात आलेली नाही.
गेल्या अनेक दिवसांपासून पाण्यासाठी होत असलेल्या त्रासामुळे बुधवार (दि.18) रोजी आज महिलांनी एकत्र येत ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी महिलांनी रिकाम्या हंड्यांच्या माध्यमातून प्रशासनाच्या विरोधात जोरदार निषेध व्यक्त केला आणि कार्यालयाला कुलूप ठोकले.
या आंदोलनात निलाबाई पवार, योगिता पवार, शिलाबाई पवार, संगीता जोंधळे, लीला जोंधळे, हर्षदा पवार, सविता पवार, वर्षा पवार, विद्या पवार, इंदुबाई पवार, मताबाई शिंदे, केदा पवार, मिलिंद पवार, प्रदीप पवार, उमेश पवार, दीपक पवार, नंदू सोनवणे, सीमा गरुड (ग्रामपंचायत सदस्य), गंगाराम ठाकरे, उर्मिला गवळी, चित्रा बिरारी, मनीषा पवार, निर्मला देवरे, शोभा पवार, उषा पगार यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
“ठेकेदाराला आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, पाईपलाईनमधील गळती दूर करण्याचे व नळ कनेक्शन देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.”
वासंती बोरसे, कनिष्ठ अभियंता (पाणी पुरवठा विभाग, पंचायत समिती, देवळा, नाशिक.