Nashik Water Issue | नाशिकच्या ग्रामीण भागात पाण्यासाठी वणवण! 338 गाव-वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाईचे सावट

Nashik Water Issue | 113 टँकरद्वारे प्रशासन भागवतेय दीड लाखांवर नागरिकांची तहान
Water Supply
Water SupplyPudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

वाढत्या उष्णतेबरोबरच जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईचे भीषण संकट उभे ठाकले आहे. भूगर्भातील पाणी पातळी खोल गेल्याने विहिरी व कूपनलिका आटल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ३३८ गावे-वाड्यांमध्ये ११३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करून एक लाख ६६ हजार ८३८ नागरिकांची तहान भागवली जात आहे.

वाढत्या तापमानामुळे जनजीवनावर परिणाम होत आहे. त्यात भर म्हणून पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. एप्रिलमध्ये अवघ्या तीन गाव पाड्यांसाठी पाणी टंचाईचा प्रस्ताव होता, मात्र आता तब्बल ३३८ गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे.

आटलेल्या विहिरी-कूपनलिका, माणसे व जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही, यामुळे प्रशासनाकडून टंचाई आराखड्यातून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात एकूण १०३ गावे व २३५ वाड्या असे एकूण ३३८ गाव-वाड्यांमध्ये पाणीटंचाई आहे.

त्यासाठी प्रशासन ११३ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करून या गाव-वाड्यांमधील एक लाख ६६ हजार ८३८ नागरिकांची तृष्णा भागवत आहे. काही ठिकाणी विहिरींना पाणी आहे; मात्र ते लांब अंतरावर आहे. त्यामुळे त्या ठिकाणी विहीर अधिग्रहण करून टँकरमध्ये पाणी उचल करून गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरच्या अधिक फेऱ्यांद्वारेही ग्रामस्थांना पाणी पुरविले जात आहे.

धरणांतील पाणीसाठ्यात घट

जिल्ह्यातील २६ धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे बाष्पीभवन होऊन पाणीसाठा घटत आहे. अनेक धरणांनी तळ गाठला असून, काही धरणांमध्ये तर ४५ टक्क्यांपेक्षाही कमी जलसाठा आहे. एकंदरीत २६ धरणांतील पाणीसाठ्याचा विचार केल्यास आज अखेर केवळ ३३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नाशिककरांवर पाणीबाणीची टांगती तलवार कायम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news