

वणी (नाशिक) : पांडाणे टोलनाक्यावर शनिवार (दि.27) रोजी आज शेतकरी व ग्रामस्थांनी जोरदार आंदोलन छेडले. वीस किलोमीटरच्या आत असलेल्या गावांमधील वाहनधारकांकडून टोल वसूल करू नये, या प्रमुख मागणीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत आप्पा कड, सामाजिक कार्यकर्ते संतोष रेहरे, बाळासाहेब घडवजे, दत्तू राऊत यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व वाहनचालकांनी ठिय्या दिला.
गुरुवार (दि.25सप्टें) व शुक्रवार (दि.26) रोजी भनवड येथे कौटुंबिक वादातून झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आदिवासी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वणी ग्रामीण रुग्णालयात आणताना पांडाणे टोलनाक्यावर वाहनाला अडवून ठेवण्यात आल्याने मौल्यवान वेळ वाया गेला. रूग्ण वाहिका तातडीने वाहतूक कोंडीतून सोडूवन पुढे रवाना केली असती तर ही महिला वाचली असती, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला.
शुक्रवार (दि.26) रोजी जीवघेणा हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला त्वरीत रुग्णालयात रवाना करावयाचे होते, मात्र टोल नाक्यावर वाहतूक कोंडीमुळे गर्दीतून रूग्ण वाहिका काढण्यात वेळ गेला आणि त्यामुळेच महिलेचा मृत्यु झाला असल्याचा आरोप आंदोलनात करण्यात आला.
टोल नाक्यावर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये
टोल नाक्यावर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये? असा प्रश्न सभापती प्रशांत कड यांनी यावेळी उपस्थित केला.आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, प्रत्येक वेळी टोलनाक्याचा ठेकेदार बदलला तरी ग्रामस्थांना आंदोलने करावी लागत आहेत. आतापर्यंत अशाच प्रकारच्या तीन घटना घडल्या असून, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वारंवार अपघात घडत आहेत. टोल प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. टोलनाका सुरळीत चालवायचा असेल तर रस्ता दुरुस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन उभारू, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी यावेळी दिला.