Nashik Voter News : 100 मतदार एकाच घरात, 'तो' फ्लॅट शोधताना दमछाक
इंदिरानगर (नाशिक) : नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभाग ३० आणि ३१ मध्ये मतदारयादीत एकाच फ्लॅटच्या पत्त्यावर १०० मतदार असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्या फ्लॅटचा शोध घेण्यासाठी विविध पक्षाच्या इच्छुकांनी संबंधित परिसर पिंजून काढला. परंतु तो फ्लॅट सापडला नसल्याने या मतदारयादीबाबत गूढ वाढले आहे.
राणेनगर येथील जाजू विद्यालयाच्या मतदान केंद्रातील हा घोळ सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. या यादीत १ ते ११७९ अशी मतदार क्रमांकांची नोंद आहे. त्यापैकी काही नावे वगळण्यात आली असली, तरी पान क्रमांक १८ पासून ४३ पर्यंत सुमारे 100 मतदारांचा पत्ता 'फ्लॅट क्रमांक २, रघुवीर अपार्टमेंट' असा छापण्यात आलेला आहे. ही पाने सध्या व्हायरल झालेली आहेत.
राणेनगर आणि चेतनानगर यादीची तपासणी करण्यात येईल. त्यात जर या प्रकाराची पुनरावृत्ती असेल, तर यादी करणाऱ्या कर्मचाऱ्याविरोधात निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येईल. तसेच अनधिकृत नावे मतदारयादीतून काढण्यासाठी मागणी करू.
विनोद दळवी, उबाठा शिवसेना, उपमहानगरप्रमुख
यादीतील घोळ शोधण्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शोधमोहीम सुरू केली आहे. एकाच फ्लॅटमध्ये राहणाऱ्या 100 मतदारांविरोधात प्रशासनाकडे अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नसून, तक्रार आल्यास त्याचा शोध घेतला जाईल, असे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले. दि. २९ ऑक्टोबर २०२४ रोजी अंतिम केलेल्या मतदारयादीतील घोळ सोशल मीडियावर चर्चिला जात आहे.

