

नाशिक : नाशिक महापालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवर हरकतींचा अक्षरश: पाऊस पडत आहे. गेल्या पाच दिवसांत महापालिकेच्या निवडणूक शाखेकडे तब्बल ९३३ हरकती दाखल झाल्या आहे. यात मंगळवारी (दि.२५) एकाच दिवसात तब्बल ६४४ हरकतींची भर पडली आहे. सिडको विभागातून सर्वाधिक ६८२, नाशिकरोड ९६ व पंचवटी विभागातून ९१ हरकती प्राप्त झाल्या आहे.
महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार गुरूवारी(दि.२०) प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आल्या. नाशिक मध्य, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम व देवळाली विधानसभा मतदार संघांच्या मतदार याद्यांवरून या मतदार याद्या तयार करण्यात आल्या आहेत. १ जुलै २०२५ पर्यंतची मतदार याद्या यासाठी ग्राह्य धरण्यात आल्या आहेत. प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवर हरकती व सूचनांसाठी २७ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुबार नावे, मयत व्यक्तींची नावांचा समावेश असून एका प्रभागातील मतदार लगतच्या दुसऱ्या प्रभागातील मतदार याद्यांमध्ये टाकण्यात आल्याने या मतदार याद्यांवर हरकतींचा अक्षरश: पाऊस पडत आहे. शिवसेना(उबाठा), काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, माकप या विरोधी पक्षांनी या मतदार याद्यांमधील घोळाविरोधात वज्रमूठ उभारली आहे. मतदार याद्या दोषमुक्त करण्यासाठी हरकतींना मुदतवाढ देण्याची मागणी केली जात आहे. विरोधी पक्षांबरोबरच सत्तारूढ गटातील शिवसेना(शिंदे गटा)ने देखील मतदार याद्यांविरोधात हरकती दाखल केल्या आहेत. इतकेच नव्हे तर भाजप आमदार सीमा हिरे यांनी देखील मतदार याद्यांमधील घोळ प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला आहे.
सिडकोत सर्वाधिक 682 हरकती
नाशिक शहरातील सहाही विभागांच्या तुलनेत सिडको विभागातून सर्वाधिक हरकती प्राप्त झाल्या आहेत. सिडकोतील प्रभाग क्रमांक २४, २५, २६, २९, ३० व ३१ या प्रभागांसंदर्भात या हरकती आहेत. सातपूर विभागात प्रभाग क्रमांक ८, ९, १० व ११ या प्रभागांविषयी तर नाशिक पूर्व विभागात प्रामुख्याने प्रभाग १३, १४ या विषयी हरकती प्राप्त झाल्या आहेत. दुबार, मयत मतदार, एका प्रभागातील मतदार दुसऱ्या प्रभागात अशा स्वरूपाच्या या हरकती आहेत.
मतदार याद्यांवरील विभागनिहाय हरकती अशा... (विभाग प्राप्तनिहाय हरकती)
मुख्यालय २८
पंचवटी ९१
नाशिक पश्चिम ९
नाशिक पूर्व १४
सातपूर १३
सिडको ६८२
नाशिकरोड ९६
एकूण ९३३
यादी प्रमुखांना नोटीसा
मंगळवारी महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी मतदार याद्यांसंदर्भात निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सिडको, सातपूर विभागातील हरकतींची वाढती संख्या लक्षात घेता या परिसरातील यादी प्रमुखांना प्रशासनाकडून नोटीसा बजावण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. प्राप्त हरकतींनुसार यादी प्रमुखांकडून प्रत्यक्ष स्थळ पंचनामे केले जात आहेत. त्यासंदर्भातील अहवाल विभागीय अधिकारी, पर्यवेक्षकांमार्फत निवडणूक शाखेला सादर केला जात आहे.