

नाशिक : नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार प्रा. देवयानी फरांदे यांचे कामच बोलते आहे. प्रचारफेऱ्या, सभा, रॅली, भेटीगाठी घेऊन त्यांनी सर्व प्रभागांतील मतदारांशी संवाद साधला आहे. गेल्या १० वर्षांतील त्यांनी केलेल्या समाजोपयोगी कामांमुळे नागरिकांचे येत्या काळात शाश्वत विकासासाठी फरांदे यांनाच मत मिळेल, असा विश्वास भाजपचे विधानसभा निवडणूकप्रमुख अनिल भालेराव यांनी व्यक्त केला.
आ. फरांदे यांची ओळख जाज्वल्य हिंदुत्ववादी नेत्या म्हणून आहे. त्यांचे हिंदुत्वविषयक प्रखर विचार, सामाजिक बांधिलकी, विविध विषयांवरील ठोस भूमिका यामुळे त्यांनी मतदारांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. त्या स्वतः उच्चशिक्षित व अभ्यासू असून, त्यांचा आकलनाचा आवाका व कामाचा झपाटा मोठा आहे. विधानसभेत सातत्याने चर्चेत सहभागी होत त्यांनी आपल्या मतदारसंघाचे प्रश्न मांडत ते मार्गी लावले. त्यासाठी वेळप्रसंगी संघर्ष केला. मोठा निधी आणला व त्याचा पूर्णपणे विनियोग विकास करण्यासाठी विविध कामांवर खर्च केला. त्यामुळेच गेल्या पाच वर्षांत अनेक प्रकल्प कार्यान्वित झाले तसेच विविध प्रकल्प पूर्णत्वाला नेल्याचे भालेराव यांनी नमूद केले.
प्रा. फरांदे या महिला, गृहिणी असल्याने त्यांचे नियोजन पक्के असते. शाश्वत विकासासाठी त्यांचा कायम कटाक्ष व आग्रह असतो. विकासकामांचा ध्यास घेऊन त्या सातत्याने आपला मतदारसंघ आदर्श कसा ठरेल यासाठी परिश्रम घेतात. विविध नावीन्यपूर्ण कल्पना त्या राबवतात. जुन्या - नव्याचा संगम साधून सर्व समाजघटकांना न्याय देण्याचे काम त्यांनी गेल्या १० वर्षांत केले आहे. ते विविध रूपांत मतदारांच्या डोळ्यासमोर आहे. आगामी पाच वर्षांच्या विकासकामांचा आराखडा तयार असून निवडून आल्यावर त्यांचे नियोजन सुरू होईल, याकडे माजी नगरसेविका डॉ. वर्षा भालेराव यांनी मतदारांचे लक्ष वेधले आहे.