

देवळा ; तालुक्यात गुरुवारी पहाटेच्या सुमारास आलेल्या अवकाळी पाऊस व पडलेल्या दाट धुक्यामुळे तालुक्यात रब्बी हंगामातील कांदा रोप, कांदा पिके, गहू, हरबरा, द्राक्ष आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसामुळे लाल कांदा व इतर पिकांच्या उत्पादनावर गंभीर परिणाम होणार आहे. याआधी खरिप पिक पंचनामा होऊनही अद्याप पावेतो याबाबत पिक विमा नुकसानभरपाई मिळालेली नाही व शासनाने यापूर्वी जाहीर केलेली खरीप पिकांची नुकसानभरपाई अजूनही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. ई पिक पाहणी रब्बी कांदा लागवडीसाठी कांदे रोप जमिनीत सडून जात आहेत.आज सकाळी पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कसमादेसह जिल्हात बहुतेक शेतकऱ्यांनी पुर्व हंगामी कांदा लागवड सुरू केलेली आहे. त्यामुळे त्यांचेही नुकसान होणार आहे. यामुळे नुकसानीची पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत. कृषी अधिकारी, कृषी सेवक, ग्रामसेवक, तलाठी यांना पंचणामे करण्याच्या सूचना देण्यात याव्यात अशी मागणी करण्यात येत आहे.
याबाबत गावात तलाठी, कृषी सेवक, ग्रामसेवक उपलब्ध होत नाही. प्रशासकीय यंत्रणा कागदोपत्री माहितीसाठी यापुढे सजा व गाव निहाय कॅम्प आयोजित करून इ,पिक पाहणी बाबत जनजगृती होणे गरजेचे आहे. आज सकाळी पडलेल्या पावसामुळे रब्बी कांद्याची रोपे, नुकतेच लागवड केलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,आज तालुक्यातील वाजगाव, खर्डे ,कणकापूर , विठेवाडी झिरे पिपळ,सावकी लोहोणेर आदी परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काही प्रमाणात खरीप तसेच रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे .