

लासलगाव (नाशिक) : द्राक्षांची पंढरी अशी ओळख असणाऱ्या निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना बदलत्या वातावरणामुळे धडकी भरली आहे. तीन ते चार अंश सेल्सिअस किमान तापमानातून द्राक्षांना ड्रीपद्वारे पाणी, औषधे देऊन तसेच बागेत शेकोट्या पेटवून उब निर्माण करत पिक वाचवले आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे, उत्तर महाराष्ट्रात खास करून नाशिक जिल्ह्यात पाऊस आणि गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यानुसार शुक्रवारी (दि. २७) सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे द्राक्ष उत्पादकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. सायंकाळपर्यंत तरी अस्मानी संकट टळल्याने सुटकेचा निश्वास सोडल्याचे चित्र पाहवयास मिळाले. पण शनिवारी (दि. २८) आणि रविवारी (दि. २९) पाऊस आणि गारपीटीची टांगती तलवार कायम आहे.
गेल्या चार-पाच वर्षांपासून वेगवेगळ्या कारणामुळे द्राक्ष उत्पादकांना कष्टाचे दाम मिळत नसल्यामुळे ५० हजार हेक्टरवरील द्राक्षबागेवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ आल्याकडे महाराष्ट्र राज्य बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले यांनी लक्ष वेधले. अस्मानी व सुलतानी संकटात द्राक्षउत्पादक देशोधडीला लागले आहेत. कधी कडाक्याची थंडी तर कधी अवकाळी पावसाचा धोका अशा कोंडीत शेतकरी सापडला आहे. केंद्र सरकारने द्राक्षाचा उत्पादनखर्च कसा कमी करता येईल, जास्तीत जास्त द्राक्ष निर्यात कशी होईल, यासाठी उपाययोजना केल्या पाहिजे अशी अपेक्षा बागायतदार शेतकरी बापू गवळी यांनी व्यक्त केली आहे.