भारत-बांगलादेश सीमा पुन्हा खुली झाल्याने व्यापाराला बूस्ट
भारत-बांगलादेश सीमा पुन्हा खुली झाल्याने व्यापाराला बूस्टpudhari news network

Nashik | सणासुदीपूर्वी ट्रक मालवाहतूक दरात उसळी; भारत-बांगलादेश सीमा पुन्हा खुली

भारत-बांगलादेश सीमा पुन्हा खुली झाल्याने व्यापाराला बूस्ट, वाहनांच्या मागणीत वाढ
Published on

नाशिक : ऑगस्ट 2024 मध्ये ट्रकच्या मालवाहतूक भाडेदरात वाढीचा कल कायम राहताना सलग दुसऱ्या महिन्यात त्यात वृद्धी झाली आहे. आगामी सणासुदीच्या हंगाम, निवडणुकीनंतर आर्थिक उलाढालींच्या वाढलेल्या वेगामुळे विविध वाहतूक मार्गांवर मालवाहतुकीच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे.

भारत-बांगलादेशच्या सीमा व्यापारासाठी पुन्हा खुल्या झाल्याने तेथे मालवाहतूक वाहन ताफ्याच्या वापरात लक्षणीय सुधारणा झाली आहे. वाहन ताफ्याचा वापर 40 टक्क्यांवरून 60 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

कोलकाता-गुवाहाटी-कोलकाता मार्गावरील ट्रक मालवाहतूक दरात 3.0 टक्के वाढ झाली आहे. दिल्ली-कोलकाता-दिल्ली आणि दिल्ली-हैदराबाद-दिल्ली या मार्गांवर अनुक्रमे 2.7 टक्के आणि 2.3 टक्के वाढ झाली आहे.

सफरचंदाचा हंगाम आणि विधानसभा निवडणुकीमुळे श्रीनगर भागात ऑगस्टमध्ये मालवाहतुकीचे दर जवळपास 10 टक्क्यांनी वाढले आहे. वायनाड प्रदेशात ट्रकची संख्या घटल्यामुळे मालवाहतुकीच्या दरात वाढ झाली आहे. तेथे बरेच ट्रक हे पुनर्वसन कार्यात गुंतलेले आहेत. गुजरातमध्ये नुकत्याच आलेल्या पुरामुळे वाहतूक क्षेत्रासमोर आव्हाने उभी राहिली असल्याचे श्रीराम मोबिलिटी बुलेटिनच्या ताजा अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मोटारकार विक्रीत ऑगस्टमध्ये 6 टक्के घट झाली आहे. जुलै 2024 मध्ये 297,623 मोटारकारची विक्री झाली होती. त्या तुलनेत ऑगस्ट 2024 मध्ये विक्री 280,151 वर आली आहे. विक्रीतील घसरणीचे मुख्य कारण पाऊस हे आहे. पावसामुळे गुजरात, आंध्र प्रदेश आणि त्रिपुरामध्ये शोरूमला भेट देणाऱ्या ग्राहकांच्या संख्येवर परिणाम दिसून आला आहे. परंतु गोवा, केरळ आणि हरियाणामध्ये वाहनांच्या विक्रीत वाढ झाली आहे.

दुचाकीतऑगस्ट 2024 मध्ये मासिक तुलनेत विक्रीत 8 टक्क्यांनी घट झाली. तथापि, आगामी सणासुदीच्या हंगामाच्या अपेक्षेमुळे वार्षिक तुलनेत विक्री 6 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले आहे. वापरलेल्या व्यावसायिक वाहनांच्या बाजारपेठेत सर्व वजन श्रेणींमध्ये गतवर्षाच्या तुलनेत भक्कम वाढ दर्शविली आहे. 31 ते 36-टन चारचाकी यूसीव्हीच्या किमती 12 टक्क्यांनी वाढल्या, तर 3.5 ते 7.5 टन श्रेणीच्या किमतीत 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

ऑगस्ट 2024 मध्ये, पेट्रोलचा वापर महिना-दर-महिना 2 टक्क्यांनी वाढला आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत पेट्रोलचा वापर 8 टक्के इतकी वाढ दर्शवितो. तथापि, डिझेलचा वापर मासिक 10 टक्क्यांनी घटला असून, डिझेलचा एकूण वापर 6.48 मेट्रिक टन इतका नोंदविला गेला आहे. टोल संकलनामध्ये मासिक तुलनेत किंचित वाढ दिसून आली आहे. यात एकूण वाहनांच्या संख्येत (व्हॉल्यूम) वार्षिक 7 टक्के वाढ, तर मूल्यात अर्थात संकलनात 8 टक्के वाढ झाली. इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीनचाकी वाहनांनी अनुक्रमे वार्षिक 26 टक्के आणि 3 टक्क्यांची घट नोंदवली.

नाशिकमधून टोमॅटो, डाळींबाचा पुरवठा

बांगलादेश सीमेच्या माध्यमातून व्यापार पुर्ववत सुरू झाल्याने नाशिकमधून कृषी व्यापारही पुर्वपदावर आला आहे. नाशिकमधून टोमॅटो, डाळींब या दोन प्रमुख कृषीमालाची निर्यात सुरू झाली आहे. नाशिकमधून दर आठवड्याला किमान ७० ते ८० ट्रक माल पश्चिम बंगालला रवाना होत आहे. तेथून हा माल बंगाली व्यापाऱ्यांच्या माध्यमातून बांगलादेशात जात आहे. बांगलादेशमध्ये सध्या टोमॅटोची प्रचंड पावसामुळे टंचाई असून नाशिकचा टोमॅटो त्यांची गरज भागवत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news