राहूड घाटात तंबाखूचा कच्चामाल वाहतूक करणाऱ्या ट्रकला लागलेली आग.Pudhari News Network
नाशिक
Nashik Truck Fire News : तंबाखूचा कच्चामाल घेऊन जाणारा ट्रक आगीत खाक
राहुड घाटातील पहाटेच्या सुमाराची घटना
चांदवड (नाशिक) : आग्रा येथून संगमनेरला तंबाखूचा कच्चा माल घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या इंजिनला आग लागून ट्रक भस्मसात झाला. गुरुवारी (दि. २०) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.
तंबाखूचा कच्चा माल घेऊन जात असलेली ट्रक (आर.जे. ११, डी. बी. ३२०१) राहूड घाटातून पहाटेच्या सुमारास जात होती. यावेळी म्हसोबा मंदिरासमोर ट्रकच्या इंजिनमधून धूर निघू लागला. त्यानंतर काही वेळातच आगीने पेट घेतला. ट्रकमध्ये तंबाखूचा कच्चामाल असल्याने आग अधिक भडकली. यावेळी ट्रकमधील चालकाने महामार्गावर पळ काढल्याने अनर्थ टळला. या घटनेची माहिती सोमा टोल कंपनीला समजताच अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून आग नियंत्रणाचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने संपूर्ण ट्रक जळून भस्मसात झाली. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

