

त्र्यंबकेश्वर : दर्शनबारीतून बेपत्ता झालेल्या परप्रांतीय भाविकाचा दोन दिवसांनी डोंगरपायथ्याला मृतदेह आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. रितेश स्वर्गियलालजी दुबे (३२, रा. गिताप्रेस, गोरखपूर) असे मयताचे नाव आहे.
रविवारी (दि. ५) उत्तरप्रदेशातील १०-१२ भाविकांचा जत्था उज्जैनमार्गे त्र्यंबकेश्वरला आले होते. सकाळी ११ वाजता ते दर्शनासाठी पूर्व दरवाजा दर्शन बारीत उभे राहिले. तेव्हा त्यांच्यातील रितेश दुबे हे रांगेतून बाहेर पडले. त्यांनी दुपारी दोन वाजता एका भ्रमणध्वनीवरुन टॅक्सी स्टँडजवळ उभा असल्याचे नातेवाईकांना कळविले. मात्र, त्यानंतर त्याचा संपर्क होऊ शकला नाही. सायंकाळी याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली गेली. सलग दोन दिवस त्याचा परिसरात शोध घेतला गेला. दरम्यान, मंगळवारी (दि. ७) रात्री आठ वाजेच्या सुमारास त्र्यंबकच्या दक्षिण बाजूस असलेल्या डोंगर टेकडीवरच्या जांबाचीवाडी मेटघर किल्ला खोलदरा येथे विवस्त्र अवस्थेत त्याचा मृतदेह मिळून आला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. त्याच्या अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणर आहे.