नाशिक : गत दोन महिन्यांपासून द्वारका सर्कलवरील सिग्नल यंत्रणा बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. या कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक शाखेने पोलिस कर्मचारी तैनात केले असले तरी, वाढत्या वाहनसंख्येमुळे आणि सर्कलला जोडलेल्या 13 रस्त्यांवरून एकाच वेळी वाहने येत असल्यामुळे वाहतूक पोलिसांची चांगलीच तारांबळ उडत आहे.
द्वारका सर्कल हे नाशिक-मुंबई, नाशिक-पुणे आणि नाशिक-छत्रपती संभाजीनगर या प्रमुख महामार्गांना जोडते. त्यामुळे या सर्कलवर नेहमीच वाहनांची गर्दी असते. ही समस्या लक्षात घेऊन तत्कालीन पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या कार्यकाळात सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली होती. त्यामुळे काही प्रमाणात वाहतुकीला शिस्त लागली होती. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून सिग्नल बंद असल्यामुळे कोंडी अधिकच तीव्र झाली आहे. येथे वाहनांची संख्या अधिक असते. सिग्नल यंत्रणा बंद असल्यामुळे एकाच वेळी तीन दिशांमधून वाहने सोडावी लागत असल्याने वाहतूक पोलिसांवरही ताण वाढला आहे. दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळेत कोंडी अधिक तीव्र होते. या वेळात सारडा सर्कलवरून द्वारका चौक पार करण्यासाठी सुमारे दीड तास लागतो. सततच्या खोळंब्यामुळे वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
या मार्गावर मोठ्या प्रमाणावर दुकाने असून ग्राहकांचीही वर्दळ असते. सततच्या ट्राफिकमुळे वाढणारे प्रदूषण हा दुकानदारांसाठीही मोठा त्रासदायक मुद्दा ठरत आहे. त्यामुळे ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.
द्वारका चौकात चारही बाजुनी येणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक पोलिस वाहतुकीचे नियंत्रण करतात. मात्र, वाहनांची संख्या जास्त असल्यान त्यांचीही तारांबळ उडते. सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणावर वाहतुककोंडी होते. त्यामुळे येथे मुंबई, पुण्याच्या धर्तीवर अंडरपासची व्यवस्था निर्माण करावी अशी मागणी आता होऊ लागली आहे.
वाहतुकोंडीमुळे परिसरातील प्रदुषणात वाढ
द्वारका चौकातील खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त
चौकातून दर मिनिटाला 300 वाहने होतात पास
शासकीय अनास्थेमुळे वर्षानुवर्षे द्वारकेवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटलेला नाही. सर्कलवरील खड्डे, लावलेले बॅरिकडेस यामुळे वाहनधारकांची अडचण होते. वाहतुककोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी महानगरपालिका, वाहतूक पोलिस आणि आरटीओ यांनी समन्वयाने नियोजन करणे गरजेचे आहे.
विजय पगार, सहजीवन नगर, पंचवटी, नाशिक.
शाळेचे वाहन असल्याने विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत वेळेवर पोहोचावे लागते. मात्र द्वारका सर्कलवरील वाहतुककोंडीमुळे शाळेत जाण्यास उशीर होतो, परिणामी विद्यार्थ्याच्या शिक्षणात व्यत्यय निर्माण होत आहे. प्रशासनाने लवकरात लवकर वाहतुककोंडीच्या प्रश्नावर उपाय करावा
शरद चौधरी, स्कुल व्हॅन चालक, नाशिक