नाशिक : गणेशोत्सवानिमित्त देखावे पाहण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी वाढू लागली आहे. वाहतुक कोंडी टाळण्यासाठी वाहतुक पोलिस शाखेने काही रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. त्यामुळे सिटीलिंक बसेसच्या काही मार्गात सायंकाळनंतच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
यंदा गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा होत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमार्फत विविध आकर्षक देखावे, आरास उभारणी केली आहे. देखावे बघण्यासाठी नाशिककारांची गर्दी होत आहे. शनिवार (दि.14) व रविवार (दि.15) व पुढे दोन शासकीय सुट्ट्या असल्याने मोठ्या प्रमाणात देखावे पाहण्यासाठी गर्दी होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन वाहतूक कोंडी व अनुचित घटना काढण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या वतीने मुख्य रस्ते वाहतुकीकरिता बंद करण्यात आली आहे. परिणामी सिटीलिंक बसेसच्या मार्गात देखील बदल करण्यात आले आहे.
सदर बदल मंगळवार दि. १७ सप्टेंबर रोजी पर्यंत दररोज सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत लागू असतील. पोलीस प्रशासनाच्या सूचनेनुसार नाशिक रोड येथून पंचवटी, सातपूरकडे जाणार्या बसेस या द्वारका सर्कल, सारडा सर्कल, गडकरी सिग्नल, चांडक सर्कल, जुना सीबीएस सिग्नल येथून जुना गंगापूर नाका सिग्नल, चोपडा लॉन्स मार्गे पंचवटीकडे जातील. तसेच दिंडोरी नाका (निमाणी) येथून सुटणार्या बसेस काट्या मारुती सिग्नल, संतोष टि पॉइंट, कन्नमवार पूल, द्वारका सर्कल मार्गे नाशिक, नाशिकरोड, अंबड, सातपूर व अन्य ठिकाणी मार्गस्थ होतील, असे सिटीलिंक प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.