

पंचवटी : म्हसरूळ - मखमलाबाद लिंक रोडवरील म्हाळसा वजन काटा परिसरात ट्रॅक्टरवर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात एका महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू झाला असून तन्वी उमाकांत गणोरे (२०) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गोखले एज्युकेशन सोसायटी, आर.एच. सपट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्सच्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत असलेली युवती तन्वी उमाकांत गणोरे (२०) रा. जुना जकात नाका, राऊ हॉटेल जवळ, मखमलाबाद ही दुपारी २.३० वाजेच्या सुमारास महाविद्यालयातून मखमलाबाद म्हसरूळ लिंक रोडने घरी इलेक्ट्रीक दुचाकी (एम.एच १५ जे.वाय २४८६) वरून जात असताना इरिकेशन कॉलनी जवळील म्हाळसा वजन काटा परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने अपघात घडला. तेथील लोकांनी तातडीने तिला खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र जबर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला आहे. याबाबत म्हसरूळ पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार सोनवणे करत आहे. तिच्या अपघाती मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.