

नाशिक : बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी शहर वाहतूक शाखेतर्फे शहरात टोइंग कारवाई सुरू करण्यात आली. मात्र, टोइंग कंत्राट संपल्याने कारवाई थांबवण्यात आली आहे. नव्याने निविदा प्रक्रिया राबवली जात असून, येत्या काही दिवसांत पुन्हा नव्याने टोइंग कारवाई प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
शहरात वाहनतळांची पुरेशी व्यवस्था नसतानाही शहर पोलिसांनी टोइंग कारवाई सुरू केली. बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी 7 एप्रिल 2022 च्या करारानुसार मे 2024 मध्ये कत्रांटास मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार नाशिकमध्ये पुन्हा टोइंग सुरू केल्याचे वाहतूक शाखेने सांगितले. मे 2024 पासून शहरातील विशिष्ट ठिकाणीच टोइंग कारवाई सुरू होती. मात्र, कारवाईबाबत अनेक तक्रारी सुरू होत्या.
शासकीय दंडाची पावती न भरताच परस्पर पैसे घेतले जात असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच पूर्वपरवानगी न देताच वाहनांवर कारवाई करणे, ठराविक ठिकाणी कारवाई करणे आदी तक्रारी होत्या. तसेच वाहनतळाची पुरेशी व्यवस्था नसणे, नो पार्किंगचा फलक नसणे आदी तक्रारीही होत्या. दरम्यान, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने या टोइंग ठेक्यास मुदतवाढ किंवा निविदा प्रक्रिया राबवता आली नाही. त्यामुळे कंत्राटाची मुदत संपल्याने गेल्या आठ दिवसांपासून शहरातील टोइंग कारवाई बंद करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असून, पुन्हा नव्याने कंत्राट देत टोइंग कारवाई सुरू होणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.
चालू वर्षात मे ते नोव्हेंबर अखेरपर्यंत शहरातील 5 हजार 49 दुचाकी व 2 हजार 482 चारचाकी वाहनांवर टोइंग कारवाई करण्यात आली आहे. त्यातून विभागाने 37 लाख 75 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दरमहा सरासरी 1 हजार वाहनांवर टोइंग कारवाई करण्यात आली.