

नाशिक : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी राज्यभर सुरू केलेली आभार दौरा यात्रा शुक्रवारी (दि. १४) नाशिकमध्ये येत आहे. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सायंकाळी ५ वाजता शिंदेंची जाहीर सभा होत असून, सभेच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी शिंदे गटाने केली आहे.
विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून पुन्हा एकदा महाराष्ट्र पिंजून काढण्यात येणार आहे. या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मंत्री शिंदे यांचे प्रयत्न असून, राज्यातील प्रत्येक विभागात जाऊन शिंदेंकडून मतदारांचे आभार मानले जात आहेत. नाशिकमध्ये शिंदे यांच्या होत असलेल्या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. ठिकठिकाणी स्वागताचे फलक, बॅनर्स उभारण्यात आले असून, शहर भगवेमय झाले आहे. गुरुवारी (दि. १३) शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, आ. सुहास कांदे, सचिव भाऊसाहेब चौधरी, सहसंपर्क नेते राजू लवटे, उपनेते अजय बोरस्ते, विजय करंजकर, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे आदींनी मैदानाची पाहणी केली. सभा यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन मंत्री भुसे यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांचे दुपारी १.४५ वाजता ठाणे येथून हेलिकॉप्टरद्वारे त्र्यंबकेश्वर येथे आगमन होईल. दुपारी २ वाजता शिंदे यांच्या हस्ते हिवाळी येथील जि. प. शाळेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण होईल. यानंतर शिंदे हे हेलिकॉप्टरने नाशिक पोलिस परेड मैदानावर येतील. नाशिक महापालिका, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सिंहस्थ व इतर अनुषांगिक विषयांवर शिंदे यांच्या उपस्थितीत दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय बैठक होईल. या बैठकीनंतर सायंकाळी ५ वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर जाहीर सभेत शिंदे संबोधित करतील.