

लासलगाव : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुमारे एक महिन्यापूर्वी लिलावात विक्री झालेल्या टोमॅटोचे पैसे शेतकऱ्यांना न मिळाल्याने ३७ शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. या शेतकऱ्यांची नऊ लाख ५६ हजार ९६० रुपयांची रक्कम थकीत आहे. रोख रक्कम देण्याची पद्धत असताना समिती प्रशासन इतके दिवस गप्प का, असा संतप्त सवाल यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केला.
लासलगाव बाजार समितीचे परवानाधारक व्यापारी, 'समृद्धी व्हेजिटेबल्स' फर्मचे संदीप उगलमुगले (पाचोरे) यांकडे जवळपास ३७ शेतकऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यात सुमारे साडेनऊ लाखांचा टोमॅटो विक्री केला होता. त्यास महिना उलटत आला तरी शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळालेले नाहीत. यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी सौदा पावत्या झळकवत सोमवारी बाजार समितीत आंदोलन केले.
माझे जवळपास ४० हजार रुपये थकीत आहेत, ते अद्याप मला मिळालेले नाहीत. बाजार समितीने या व्यापाऱ्यावर कारवाई करून आमचे पैसे कसे मिळतील यासाठी प्रयत्न करावेत.
अनिल चितळकर, शेतकरी, शिरवाडे वाकद, नाशिक.
वाहनाच्या नंबर प्लेटवर 'पोलिस' लावून फिरणारा सदर व्यापारी उडावाउडवीची उत्तरे देत असल्याने त्यास समितीचे प्रतिनिधी व शेतकऱ्यांनी पोलिस ठाण्यात नेले. वेळापूर येथील शेतकरी विशाल पालवे, विठ्ठल बोराडे, गोकुळ पोटे, रमेश पानगव्हाणे यांच्यासह इतरांनी चर्चेत भाग घेतला. मात्र, यावर तोडगा निघू न शकल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने वातावरण निवळले. जिल्हा उपनिबंधक व जिल्हा निबंधक यांच्याकडे गाऱ्हाणे मांडण्याचा यावेळी निर्णय झाला.
22 ऑक्टोबरला या व्यापाऱ्याकडे टोमॅटो विक्री केल्यानंतर उद्या पैसे देतो, या बोलीवर जवळपास महिना उलटला. तरी मला माझे पैसे मिळाले नाहीत. माझ्या कुटुंबाची दिवाळी यामुळे अडचणीत गेली. या व्यापाऱ्यावर कारवाई करावी.
विठ्ठल बोराडे, टोमॅटो उत्पादक, पाटोदा, नाशिक.
शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून संबंधित व्यापाऱ्याला बाजार समितीने नोटीस बजावली आहे. नोटीसीचे उत्तर आल्यानंतर बाजार समिती नियम कायदा ५३ नुसार त्यावर कारवाई करण्यात येईल. रक्कम वसूल करून शेतकऱ्यांचे पैसे देण्यात येतील.
नरेंद्र वाढवणे, सचिव, लासलगाव बाजार समिती, नाशिक.