

नाशिक : नामदेव भोर
शहरासह जिल्ह्यात सीएनजीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे वाहनचालकांना सध्या तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असतानाच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दीर्घकालीन उपाययोजनांना वेग दिला आहे. जिल्ह्यातील सीएनजी पंपांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवण्याच्या दृष्टीने १२१ नवीन सीएनजी पंप उभारण्याचे नियोजन करण्यात आले असून, पुरवठा विभागाच्या सूचनेला इंधन पुरवठादार कंपन्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
त्यामुळे आगामी काळात सीएनजी पंपांवरील रांगा कमी होण्याची शक्यता आहे.
सध्या जिल्ह्यात सुमारे २३ सीएनजी पंप कार्यरत आहेत. त्यात आठ ऑनलाइन, तर १५ ऑफलाइन पंपांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात नाशिक शहरामध्ये देशभरातून मोठ्या संख्येने भाविकांसह असंख्य वाहने दाखल होणार आहेत.
सार्वजनिक वाहतूक, टॅक्सी, रिक्षा, खाजगी वाहने तसेच बाहेरून येणाऱ्या वाहनांमध्ये सीएनजी वाहनांचे प्रमाण मोठे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याची पंपसंख्या आणि पुरवठा व्यवस्था सिंहस्थाच्या काळात अपुरी पडू नये, यासाठी प्रशासनाने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे.
"जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेनुसार पुरवठा शाखेकडून इंधन कंपन्यांबरोबर समन्वय साधून, जिल्ह्यातील विविध भागांत नवीन सीएनजी पंप उभारण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. त्याला कंपन्यांकडून प्रतिसाद मिळत असून, जिल्ह्यात तब्बल १२१ ठिकाणी नवीन सीएनजी पंप उभारण्यात येणार आहेत."
- रमेश गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी
"सीएनजी पंपांना मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढवण्याची गरज आहे. सीएनजी पुरवठ्याचा नियमित आढावा घेत गरजेनुसार अतिरिक्त गॅस उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. सध्या काही पंपांवर मागणीच्या तुलनेत कमी प्रमाणात पुरवठा होत असल्याने अशा पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या पंपांना ऑनलाइन पुरवठा सुरू करणे आवश्यक आहे."
- ॲड. मुकुंद आढाव, आढाव पेट्रोलियम
सिंहस्थापूर्वी यंत्रणा सक्षम करण्याचे आव्हान:
सिंहस्थ कुंभमेळा काळात मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढणार असल्यामुळे केवळ पंपांची संख्या वाढविणे पुरेसे ठरणार नसून, त्यांना नियमित आणि पुरेशा दाबाने सीएनजी उपलब्ध करून देणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.
त्यामुळे नवीन पंप उभारणीबरोबरच गॅसवाहिन्या, पुरवठा क्षमता आणि वितरण यंत्रणेची क्षमता वाढविण्यावर प्रशासनाला भर द्यावा लागणार आहे. १२१ नवीन पंपांच्या नियोजनामुळे जिल्ह्यातील सीएनजी नेटवर्क विस्तारण्यास मोठी मदत होणार असून, सिंहस्थ कुंभमेळा काळात वाहनचालकांना इंधनासाठी तासन्तास रांगेत उभे राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी ही तयारी महत्त्वाची ठरणार आहे.
सीएनजी सद्यःस्थिती, प्रस्तावित वाढ:
सध्या कार्यरत पंप : सुमारे २३
ऑनलाइन पंप : ०८
ऑफलाइन पंप : १५
प्रस्तावित नवीन पंप : १२१
मुख्य उद्देश : सिंहस्थासाठी पुरवठा यंत्रणा सक्षम करणे.
अपेक्षित परिणाम : शहरातील पंपांवरील रांगा व ग्राहकांचा प्रतीक्षा कालावधी कमी करणे.