

देवळा : भरदिवसा शेतमजूराचे घर फोडल्याचा प्रकार रविवारी (दि.१६) खर्डे येथून जवळच असलेल्या कणकापूर येथे उघडकीस आला. याप्रकरणी देवळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी याची कसून चौकशी करून चोरट्याला जेरबंद करावे, अशी मागणी उपसरपंच जगदीश शिंदे यांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, देवळा तालुक्यातील कणकापूर येथील शेतमंजूर दादाजी देवराम बर्डे हे येथे भाड्याच्या घरात राहतात. त्यांच्या वाट्याची जमीन या भागात आहे. त्यामुळे ते रविवारी (दि.१६) घराला कुलूप लावून सकाळी शेतात गेले होते. यादरम्यान घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन चोरट्याने त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. व घरातील कपाट फोडून कपाटातील २० हजार रुपये चोरून नेले. शेतातून घरी आल्यानंतर त्यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती पोलीस पाटील जैन यांना देत देवळा पोलीस ठाण्यात धाव घेतली.