

सिन्नर (नाशिक) : ट्रेलर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नी आणि दोन वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि. 26) रात्री 7.30 च्या सुमारास घडली. सिन्नर - घोटी महामार्गावर बेलू फाटा येथे हा अपघात घडला.
सुनील मावजी खोडके (23), रुक्मिणी सुनील खोडके (20, रा. जाधववाडी, हिवरे, ता. सिन्नर) आणि त्यांचा दोन वर्षांचा मुलगा राज अशी मृतांची नावे आहेत. एकाच कुटुंबातील तिघांचा अपघाती मृत्यू झाल्याने हिवरेसह परिसरावर शोककळा पसरली आहे.
सुनील खोडके हे पत्नी रुक्मिणी आणि मुलगा राज यांच्यासमवेत गुरुवारी पिंपळगाव घाडगा परिसरातील गिर्हेवाडी येथे सासूरवाडीला गेले होते. तेथून पल्सर (एमएच 15, ईडब्ल्यू 4377) दुचाकीवरून परतताना बेलू फाटा येथे सिन्नरकडून घोटीकडे भरधाव येणार्या ट्रेलरने (एमएच 43, बीपी 1485) त्यांना समोरून जबर धडक दिली. त्यात ट्रेलरच्या चाकाखाली पल्सर सापडल्याने पती, पत्नी आणि मुलगा हे तिघेही चिरडले गेले.
दरम्यान, स्थानिकांनी मदतकार्य करत त्यांना तातडीने एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सिन्नर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक संजय गोसावी यांनी घटनास्थळी पंचनामा केला.
अपघाताचा पंचनामा, ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर शुक्रवारी (दि. 27) सकाळी 10 वाजता एकाच चितेवर आई - वडील आणि मुलावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने हिवरेकरांचे मन हेलावले. सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून, गाव परिसरात प्रथमच अशी दु:खद घटना घडल्याचे ग्रामस्थांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.
अपघातातील मृत ट्रेलरखाली दबून चेंदामेंदा झाल्याने त्यांची ओळख पटणे अवघड झाले होते. रुक्मिणी मधे नावाचे आधारकार्ड अपघातस्थळी सापडल्यानंतर त्यावरील पत्त्यावरून पोलिस उपनिरीक्षक संजय गोसावी यांनी पिंपळगाव घाडगा, ता. इगतपुरी येथे संपर्क साधून सुनील खोडके व रुक्मिणी सुनील खोडके या मृतांची ओळख पटवली.