

दिंडोरी : शहरासह तालुक्यामध्ये दिवसागणिक तापमानाच्या पाऱ्यात घट होत असल्याने थंडीचा कडाका चांगला वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना चांगलीच हुडहूडी भरली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तापमानाचा पारा ९ ते १२ अंश सेल्सिअस दरम्यान स्थिरावला आहे. थंडीपासून बचावासाठी नागरिकांकडून शेकोट्यांचा आधार घेतला जात आहे. तसेच वाढत्या थंडीमुळे द्राक्षबागांना धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांकडून बागांमध्ये शेकोटी पेटवून तापमान नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दिंडोरी तालुक्यात थंडीच्या कडाक्यामुळे जनजीवन विस्कळित झाले असून शेतीच्या कामकाजावरही परिणाम जाणवत आहे. करंजवण, ओझरखेड, वाघाड, पुणेगाव आदी धरण परिसरात सकाळच्या सुमारास आल्हादायक वातावरण निर्माण होत असल्याने नागरिक त्याचा आनंद घेताना दिसत आहे. वाढती थंडी रब्बी हंगामातील पिकांसाठी पाेषक मानली जात असल्याने शेतकरी सुखावले आहेत. काही भागांत विविध पिकांच्या लागवडीला उशीर झाला असला तरी गहू, हरभरा आदी पिकांच्या लागवडीने सर्वत्र वेग घेतला आहे. सध्या पहाटे थंडी, दुपारी ऊन व रात्री पुन्हा गारवा असा प्रकार पहावयास मिळत आहे. हवेतील गारवा, धूळ, मातीचे कण, आहारातील बदल अशा अनेक कारणांमुळे आरोग्याच्या समस्याही उद्भवत आहेत. यामध्ये प्रामुख्याने सर्दी, खोकला, ताप अशा त्रासांचा समावेश आहे. यंदा कोरड्या खोकल्याची समस्या प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. त्यामुळे रुग्ण हैराण झाले आहेत. तात्पुरता औषधोपचार आणि घरगुती उपाय योजनांनी दोन-चार दिवसांत खोकला बरा होत असायचा मात्र सध्या आठ ते दहा दिवस उलटूनही सर्दी, खोकल्याने नागरिक त्रस्त असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.