Nashik | पंचवटीत पोलिस चौकीसमोरच माजी नगरसेवकाच्या पुत्राने केला गोळीबार

पोलिस अनभिज्ञ : माजी नगरसेवकपूत्र भूषण लोंढेविरुद्ध गुन्हा दाखल
firing
गोळीबारfile photo
Published on
Updated on

नाशिक : शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यात पोलिस यंत्रणा सपशेल अपयशी ठरताना दिसत आहे. खून, दरोड्याच्या घटना नित्याच्याच झाल्या असून, गुन्हेगार पोलिसांच्या नाकावर टिच्चून खुलेआमपणे शस्त्रास्त्रांचा वापर करीत आहेत. मालेगाव स्टॅण्ड परिसरात पोलिस चौकीसमोरच गुन्हेगारांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. गंभीर बाब म्हणजे बुधवारी (दि.९) मध्यरात्री घडलेल्या या घटनेचा उलगडा शनिवारी (दि.१२) झाल्याने पोलिसांच्या कामगिरीवर शंका उपस्थित केली जात आहे.

९ ऑक्टाेबरच्या मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास मालेगाव स्टॅण्ड पोलिस चौकीसमोर एका सराईत गुन्हेगाराने दुसऱ्या एका सराईत गुन्हेगारावर गोळीबार केला. शनिवारी (दि.१२) जेव्हा परिसरातील सीसीटीव्ही बघण्यात आले, तेव्हा या संपूर्ण प्रकाराचा उलगडा झाला. यामध्ये माजी नगरसेवक तथा रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांचा मुलगा संशयित भूषण लोंढे, प्रिन्स चित्रसेन सिंग व त्यांच्या साथीदारांचा सहभाग असल्याचे सीसीटीव्हीवरून दिसून येत आहे. ज्याच्यावर गोळीबार केला गेला, तो देखील सराईत गुन्हेगार असून, पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याचा अंदाज आहे.

रामवाडी परिसरातील सराईत गुन्हेगार अजय बाेरिसा याच्यावर हा गाेळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समाेर येत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित भूषण लाेंढेसह त्याच्या साथीदारांचे बाेरिसा व त्याच्या काही साथीदारांशी पूर्ववैमनस्य आहे. त्याचसंदर्भातील सेटलमेंट व समझाेता करून प्रकरणे मिटविण्यासाठी दाेन्ही गटांची नियाेजित भेट झाली. त्यात समाेरासमाेर चर्चा सुरू असतानाच ती काहीतरी वादातून फिस्कटल्याने संशयित भूषण याने पिस्तूल वा गावठी कट्ट्यातून जमिनीवर दाेन ते तीन राऊंड गाेळीबार केल्याची माहिती समाेर येत आहे. बोरिसा व त्याच्या साथीदारांनी घटनास्थळावरून पळ काढल्याने ते बालबाल बचावले तर माझ्यावर गोळीबारच झाला नसल्याचा कांगावा बोरिसा याना केला आहे. मात्र, गोळीबाराचा आवाज झाल्याने, गुन्हेशाखा युनिट एकने सीसीटीव्ही तपासल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी स्वत:हून पुढे येत फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखा युनिट एकच्या उपनिरीक्षकांच्या फिर्यादीनुसार संशयित भूषण लोंढेसह अन्य साथीदारांवर पंचवटी पाेलिसांत गुन्हा नाेंद झाला आहे. संशयितांच्या मागावर पोलिस पथके रवाना करण्यात आले असून, रात्री उशिरापर्यंत कोणासही ताब्यात घेण्यात आले नसल्याची पोलिसांनी सांगितले.

प्रकरण दाबण्याचा प्रयत्न?

गोळीबाराची घटना घडून तीन दिवस झाल्यानंतरही पोलिसांकडून या घटनेला दुजोरा दिला जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. गोळीबाराचा आवाज ऐकू आल्यानंतर पोलिस तपासाबाबत कचुराई करीत असल्याने, प्रकरण दाबण्यासाठी तर प्रयत्न केले जात नाही ना? अशीही चर्चा आता स्थानिकांमध्ये रंगू लागली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news