

नाशिक : न्यायालयीन आदेशानुसार झडती वॉरंटची अंमलबजावणीसाठी आलेल्या पोलिस अधिकाऱ्यास धक्काबुक्की करणाऱ्या दाम्पत्यास न्यायालयाने तीन महिने साधा कारावास आणि १० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. २९ डिसेंबर २०२१ रोजी पंचवटीतील अमृतधाम येथील अयोध्यानगरी परिसरात हा प्रकार घडलेला आहे.
मथिएस ऑगस्तुस एक्का व ललिता मथिएस एक्का (दोघे रा. अयोध्यानगरी) अशी शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. तत्कालीन उपनिरीक्षक पंकज सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार, ते एक्का यांच्या घरी वॉरंट झडतीसाठी गेले होते. त्यावेळी एक्का दाम्पत्यासह इतर दोघा संशयितांनी सोनवणे यांना धक्काबुक्की करीत गणवेश फाडला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात चौघांविरोधात सरकारी कामातत अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन उपनिरीक्षक वाय. एस. माळी यांनी तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. रवींद्र एल. निकम यांनी युक्तीवाद केला. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. उमेशचंद्र जे. मोरे यांनी एक्का दाम्पत्यास शिक्षा सुनावली. तर इतर दोघांना पुराव्या अभावी निर्दोष सोडले. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हवालदार मधुकर पिंगळे, गणेश चिखले यांनी कामकाज पाहिले.