Nashik | उद्योगांच्या फाईल्सचा नाशिक-मुंबई प्रवास थांबणार

दर गुरुवारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी नाशिकमध्ये : संभाजीनगरही देणार भेट
नाशिक एमआयडीसी
नाशिक एमआयडीसी pudhari news network
Published on
Updated on

नाशिक : नवीन उद्योग उभारायचा असल्यास किंवा उद्योगांशी निगडीत एखादी मंजूरी मिळवायची असल्यास त्याबाबतच्या फाइलला नाशिक ते मुंबई असा प्रवास करावा लागतो. यात वेळेचा मोठा अपव्यय होत असल्याने, आता नाशिक ते मुंबई या फाइल्सच्या प्रवासालाच ब्रेक लावला जाणार आहे. एमआयडीसीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दर गुरुवारी नाशिकमध्ये येऊन फाइल्सचा निपटारा करणार असून, छत्रपती संभाजीनगर एमआयडीसीलाही त्या वेळ देणार आहेत.

शुक्रवारी (दि. 3) एमआयडीसीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे यांनी नाशिक कार्यालयास भेट देत, अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तसेच निमासह अन्य औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. यावेळी उद्योगांशी निगडीत फाइल्सला नाशिक ते मुंबई असा प्रवास करावा लागत असल्याने, त्यात बराच वेळ खर्ची होत आहे. बऱ्याचदा तर एखाद्या फाइलमध्ये त्रुटी आढळल्यास, ती फाइल नाशिक कार्यालयात पाठवली जाते. तसेच त्रुटी दूर करून पुन्हा मुंबईला रवाना करावी लागत असल्याने, त्यात बराच वेळ लागत असल्याच्या उद्योजकांच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर आता उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे या दर गुरुवारी नाशिक एमआयडीसी कार्यालयात या फाइल्सचा निपटारा करणार आहेत. तसेच छत्रपती संभाजी नगर याठिकाणी देखील पंधरा दिवसातून एकदा भेट देणार आहेत.

दरम्यान, या निर्णयामुळे उद्योग फाइल्स झटपट निकाली काढण्यास मोठी मदत होणार आहे. याशिवाय वेळेची देखील मोठी मदत होणार असल्याच्या प्रतिक्रिया उद्योजकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. सध्या नाशिक एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी पदाचा वाद 'मॅट'मध्ये प्रलंबित असल्याने, अनेक कामे तसेच फाइल्स रखडल्या आहेत. उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे उद्योजकांची कामे मार्गी लावण्यास मदत होईल.

'आरओ' पदाचा उद्या निर्णय

नाशिक एमआयडीसी आरओ अर्थात प्रादेशिक अधिकारीपदाचा वाद मॅटमध्ये मागील काही महिन्यांपासून प्रलंबित असून, त्याबाबतची सुनावणी सोमवारी (दि.6) ठेवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून तारखांवर तारिख दिल्या जात आहेत. त्यामुळे सोमवारी अंतिम निकाल समोर येण्याची शक्यता आहे. दीपक पाटील यांच्या नियुक्तीविरोधात गणेश राठोड मॅटमध्ये गेले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news