Nashik । गटबाजीच्या चिखलात कोदंडाची घुसमट !

सत्तेचा सारीपाट : सत्तेची ऊब गटबाजीच्या ग्रहणाने काळवंडली
Nashik
NashikPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक । मिलिंंद सजगुरे

जन्मत:च सत्तेची ऊब लाभलेली एकनाथ शिंदेंची शिवसेना राज्यभर बाळसे धरत असताना नाशिकमध्ये मात्र, ती गटबाजीच्या ग्रहणाने काळवंडली आहे. उदंड झालेल्या इथल्या गटबाजीचा रव थेट मुंबापुरीपर्यंत पोहोचल्याने पक्षातील दुसरी शक्ती मानल्या जाणाऱ्या खा. श्रीकांत शिंदे यांनाच त्याची दखल घ्यावी लागली. महापालिका निवडणूक तयारीच्या नावाखाली तब्बल नऊ तास घेतलेल्या बैठकीत नाशिकस्थित शिवसेनेत काय चाललेय, याचा अंदाज त्यांना आला. गटबाजी संपवण्यासाठी एवढ्या तासांचे डोसही अपुरे पडले की काय, खा. शिंदे पुढील आठवड्यात पक्ष डागडुजीसाठी नाशिक मुक्कामी येणार असल्याची वार्ता आहे.

एकसंध शिवसेनेपासून असलेला गटबाजीचा शाप शिंदेंच्या नेतृत्वाखाली सवतासुभ्यात स्वतंत्र चूल मांडलेल्या पक्षातही अव्याहत आहे. एक उपनेत्याविरोधात दुसरा उपनेता अन् शहराध्यक्षाची वज्रमूठ पदाधिकारी-कार्यकर्त्यांतील गोंधळाचे मूळ कारण आहे. यामधूनच नेमकी मर्जी सांभाळायची कोणाची, हा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर आहे. ऐन महापालिका निवडणूक तोंडावर असताना पक्षातील बेदिलीने कळस गाठला आहे. सत्तेच्या माध्यमातून जनसामान्यांची कामे तडीस लागणे दूरच, परस्परांचे पतंग कापण्याची स्थानिक नेतृत्वातील स्पर्धा अनाकलनीय वाटते. या यादवीचे मूळ मुंबईच्या नेत्याची भाऊगिरी आणि अर्थकारण असल्याची चर्चा आहे. उपरोल्लेखित एका गटाला बळ देण्याचे काम करण्याची शिक्षा म्हणूनच की काय, संपर्क सचिवाला कात्रजचा घाट दाखवत पक्षाध्यक्षांनी मर्जीतल्या राम रेपाळे अन् संजय मोरे या शागिर्दांना नाशिकच्या सुभेदारीची जबाबदारी दिल्याची चर्चा आहे.

महायुतीतील भाजप स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवण्याबाबत आक्रमक असताना शिंदेंच्या सेनेनेही तशी तयारी सुरू केल्याचे सांगण्यात येतेय. अशा परिस्थितीत शिंदेंच्या सेनेला शंभरहून अधिक जागा लढून बहुमताचा सोपान गाठण्याची शक्यता किमान नाशिकपुरती धूसर वाटते. पक्षसंघटन वर्धिष्णू होण्यासाठी कॅबिनेट व राज्यमंत्र्यांसह दोन उपनेते, सहसंपर्कप्रमुख, दोन जिल्हाप्रमुख अशी फळी असताना पक्षातील दुफळीचीच अधिक चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर खा. श्रीकांत शिंदे येत्या २४ मे रोजीच्या दौऱ्यात गटबाजांना नेमका कोणता डोस देतात, याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागून राहणार आहे.

अनेकांच्या पक्षप्रवेशाला ब्रेक!

एकीकडे नाशिक शहरासह जिल्ह्यात भाजपचा प्रभाव वाढत असताना दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत पक्ष उमेदवाराच्या दारुण पराभवातून शिवसेना शिंदे गट आत्मपरीक्षण करण्याच्या मन:स्थितीत नाही. आगामी महापालिका निवडणुकीतील दमदार एन्ट्रीसाठी आतुर असलेल्या स्थानिक नेतृत्वाला बळ देण्यापाेटी खुद्द एकनाथ शिंदेंनी पुरेसे फंडिंग दिले. मात्र, त्यावरूनही पक्षात घमासान सुरू आहे. कॉंग्रेसच्या माजी महिला प्रवक्त्यांनी प्रवेशानंतर महिन्याच्या आत पक्षाला दिलेली सोडचिठ्ठी टोकाला पोहोचलेल्या गटबाजीचा परिपाक असल्याचे मानले जाते. इतर पक्षांतील अनेकांच्या पक्षप्रवेशाला याच कारणाने ब्रेक लागल्याचीही चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news