नाशिक : गणेशोत्सवासाठी बाजारपेठेत मूर्तीचे नानाविध प्रकार आले आहेत. त्यामध्ये निऑन-रेडियम इफेक्ट मूर्ती भक्तांचे आकर्षण ठरत आहेत. काही प्रयोगशील मूर्तीकार कागदाचा लगदा, गेरु, काष्ठ निर्मित पर्यावरणास्नेही मूर्ती तयार करत अभिनवता जोपासत आहेत.
डोंगरे वसतीगृह मैदानावरील गणेश मूर्ती स्टॉलमध्ये निऑन इफेक्ट गणेशमूर्ती भक्तांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. या मूर्तीवर रात्री विशिष्ट प्रकाशझोत टाकल्यास त्या तेजस्वी रंगात उजळून निघतात. हा इफेक्ट ग्राहकांना आकर्षित करत असल्याने गणेश मंडळाच्या प्रतिष्ठापणेसाठी अशा मूर्तींना पसंती देत असल्याचे चित्र आहे.
घरगुती गणेशपूजनात मातीच्याच मूर्तीची प्रतिष्ठापना अन् पूजन करण्याचा प्रघात आहे. तरिही विविध माध्यमामधील 'श्रीं'च्या मूर्ती बाजारपेठेत विक्रीसाठी आल्या आहेत. काही युवा मूर्तीकारांनी कागदाचा लगदा, काष्ठ, गेरुमाती, लालमाती आदी पर्यावरणपूरक गोष्टीपासून मूर्तीची निर्मिती करुन त्यांची विक्री करताना दिसत आहे.
विशेष म्हणजे मूर्तीवरील साज पारंपरिक मूर्तींप्रमाणे नसून त्यांना पुरातन मूर्ती किंवा धातूसारख्या अलंकाराचे रुप देण्यात आल्याने या मूर्ती पहाता क्षणी लक्ष वेधून घेत आहेत. गणरायच्या डोळ्यातील भाव मूर्तीमधील आव्हानात्मक काम असून, तेच मुख्य सौंदर्य असते. याही मूर्तीमधील नेत्रांमध्ये जीवंतपणाचा भास निर्माण करतात. कलेचे कुठलेही शास्त्रोक्त शिक्षण न घेतलेल्या या मूर्तीकाराने बाप्पाच्या मूर्ती पेटींग, चित्रकलेतील निअॉन रंगाने वेगळा इफेक्ट दिला आहे. मूर्तींवर प्रकाशझोत टाकताच त्या लखलखतात. रेडीयम-फ्ल्यूरोसंट मूर्तींमधील नेत्रभाव जीवंतपणाचा भास देतात. महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेले बाप्पा एक वेगळ्या माध्यमातून सर्वांसमोर येत असल्याने मूर्तीकाराच्या या अभिनवतेला गणेशभक्तांची दाद मिळत असल्याचे चित्र आहे.
गणेश मूर्तीमध्ये नावीन्य आणण्यासाठी गेल्या वर्षीपासून रेडीयम इफेक्ट देणाऱ्या आणि रात्री चमकणाऱ्या निऑन मूर्ती तयार करण्याचा ध्यास घेतला आहे . ग्राहकांनाही उत्सवासाठी नवनवीन कल्पनांवर आधारीत बाप्पा भावतात. मूर्तींवर निळा अथवा विशिष्ट रंगाचा प्रकाशझोत टाकल्यास त्यांचे रुप उजळून निघते. या नवीनतेला भाविकांचा प्रतिसाद लाभत आहे.
विकास सोनवणे, मूर्तीकार. ओढा, नाशिक.