

नाशिक : आसिफ सय्यद
एकविसाव्या शतकातही खुळचट पुरूषी मानसिकता कायम असून, पुरूष प्रधान संस्कृती म्हणून मिरवणाऱ्या समाजात कुटूंब नियोजनाचा भार स्त्रियांवरच असल्याचे धक्कादायक वास्तव राज्यातील कुटूंब नियोजन शस्त्रक्रियेच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.
राज्यातील पुरूष नसबंदीचे प्रमाण उद्दीष्टाच्या जेमतेम पाच टक्के इतके असून गेल्या दहा वर्षात अवघ्या ९१ हजार ५६८ पुरूषांवर नसबंदीची शस्त्रक्रिया करण्यात आली केली. गेल्या वर्षभरात स्त्रियांनी केलेल्या नसबंदीच्या आकडेवारीच्या तुलनेत गेल्या दहा वर्षातील पुरूष नसबंदीची आकडेवारी एक तृतीयांश देखील नसल्याचे राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आली आहे.
लोकसभंख्या नियंत्रणासाठी राज्याच्या आरोग्य विभागातर्फे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया कार्यक्रम राबविल जातो. एक किंवा दोन मुलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून कुटुंब नियोजन करावे, असा सल्ला आरोग्य विभागातर्फे दिला जातो. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आरोग्य विभागातर्फे लाभार्थ्यास ९०० ते १३०० रुपये अनुदानही दिले जाते. महिलांसाठी टाक्याची व बिनटाक्याची अशा दोन प्रकारे शस्त्रक्रिया केली जाते तर पुरूषांसाठी नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात येते. आरोग्य विभागाकडून या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते. कुटुंब नियोजनासाठी महिला किंवा पुरुष यापैकी कोणीही एकाने शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. वास्तविक पाहता कुटुंब नियोजनाची जबाबदारी स्त्री आणि पुरूष दोघांची समान आहे. मात्र, पुरुषप्रधान संस्कृतीमुळे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचा भार स्त्रियांच्याच खांद्यावर टाकला जात आहे. वैवाहिक दाम्पत्यामध्ये अपत्यप्राप्तीनंतर कुटुंब नियोजनाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जातो. त्यात महिलाच पुढे आहेत. गेल्या दोन वर्षातील राज्यातील स्त्री-पुरूष कुटुंब नियोजन शस्त्रकियेची आकडेवारी पुरोगामित्वाचा आणि स्त्री-पुरूष समानतेचा टेंभा मिरवणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे.
वर्ष - पुरूष नसबंदी शस्त्रक्रिया
२०१५-१६ : १३९५२
२०१६-१७ : १४८२१
२०१७-१८ : १३९६८
२०१८-१९ : ८६९८
२०१९-२० : ८९४३
२०२०-२१ : ५२९९
२०२१-२२ : ७४१४
२०२२-२३ : ९५११
२०२३-२४ : ६२७८
२०२४-२५ (सप्टेंबर २०२४) : २६८४
२०१५-१६ पासून गेल्या दहा वर्षात जेमतेम ९१,५६८ पुरूषांनी नसबंदीची शस्त्रक्रिया केली आहे. २०२३-२४ ते २०२४-२५(सप्टेंबर २०२५ अखेर) या गेल्या दोन वर्षात ८,९६२ पुरूषांवर नसबंदीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ही टक्केवारी निर्धारीत उद्दीष्टाच्या अवघे पाच टक्के इतकीच आहे. विशेष म्हणजे स्त्रियांवरील नसबंदी शस्त्रक्रियेसाठी प्रतिवर्षी पाच लाखांचे उद्दीष्ट्य निश्चित केले जात असते. त्यातुलनेत पुरूषांवरील नसबंदी शस्त्रक्रियेसाठी जेमतेम ५० हजार इतकेच उद्दीष्ट्य निश्चित केले जाते. या उद्दीष्टाच्या जेमतेम पाच टक्केच पुरूष नसबंदीची शस्त्रक्रिया करत असल्यामुळे शासनाने कुटुंब कल्याण कार्यक्रमावर अधिक जोर देण्याची आवश्यकता आहे.
नसबंदी शस्त्रक्रियेत पुरूषांचे प्रमाण नगण्य असताना कुटूंब नियोजन शस्त्रक्रियेत स्त्रियांचा सहभाग मात्र लक्षणीय राहिला आहे. गेल्या दोन वर्षात तब्बल ४ लाख २३ हजार ७८३ स्त्रियांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली आहे. यात २०२३-२४ मध्ये २,९६,७७४ स्त्रियांवर नसबंदीची शस्त्रक्रिया करण्यात आली तर २०२४-२५(सप्टेंबर २०२५ अखेर) १,२७,००९ स्त्रियांवर नसबंदीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. स्त्रियांवरील कुटूंब नियोजनाची गेल्या २०२३-२४ या वर्षातील टक्केवारी ५८ टक्के इतकी आहे. तर २०२४-२५ या वर्षातील पहिल्या सात महिन्यात उद्दीष्टाच्या २५ टक्के महिलांवर नसबंदीची शस्त्रक्रिया करण्यात आली.
कुटूंब नियोजनात तांबी अर्थात 'कॉपर टी'चाही वापर स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. गेल्या दोन वर्षात राज्यभरातील ६.८३ लाख स्त्रियांनी तांबी बसवून कुटुंब नियोजनात वाटा उचलला. बाळांतपणानंतर अनेकदा काळजी न घेतल्याने वर्षाच्या आत घरात पुन्हा पाळणा हलण्याची शक्यता वाढते. याशिवाय, आधी जन्मलेल्या मुलांचे मातेकडून योग्य पोषणही होत नाही. मातेचे आरोग्य देखील बिघडते. अशा वेळी तांबी बसविणे आरोग्यदायी ठरते.