नाशिक : मराठी विद्यापीठाची वास्तू होणार जागतिक दर्जाची | Devendra Fadnavis

उपमुख्यमंत्री फडवणीस यांची ग्वाही : महानुभाव कृतज्ञता सोहळा
कृतज्ञता सन्मान नाशिक
नाशिक : अखिल भारतीय महानुभाव पंथीयांतर्फे देवेंद्र फडणवीस यांचा कृतज्ञता सन्मान करताना कारंजेकर बाबा, बाळासाहेब सानप आदी. (छाया : हेमंत घोरपडे)
Published on
Updated on

नाशिक : महाराष्ट्र आणि मराठी भाषा ही स्वाभिमान आणि अस्मितेची बाब आहे. जिथे मराठीचा आद्य ग्रंथ लिहिला गेला, ज्या भूमीने साहित्य अन् समृद्ध विचार दिले, त्या रिद्धपूरमध्ये येत्या पाच वर्षांत मराठीचे भव्यदिव्य, जागतिक दर्जाचे अप्रतिम विद्यापीठ उभारले जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis, Deputy Chief Minister of Maharashtra) यांनी दिली.

अखिल भारतीय महानुभाव पंथ यांच्यातर्फे समाजघटकांसाठी केलेल्या भरीव कार्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रेशमी फेटा, मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा कृतज्ञता सन्मान करण्यात आला. शनिवारी (दि. २८) महाकवी कालिदास कलामंदिरात झालेल्या या सत्कार समारंभाला उत्तर देताना ते बोलत होते. पंथाचे विकासपुरुष कविश्वर कुळाचार्य कारंजेकर बाबा यांच्यासह महंत व मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला. व्यासपीठावर आयोजन समितीचे बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, माजी मंत्री भारती पवार, राजेंद्र जायभावे, अविनाश ठाकरे, बाबा बीडकर, लासूरकर बाबा, बाभूळकर, सेवलीकर आदी महंत उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, महानुभाव पंथ नि:स्वार्थ भावनेने काम करणार समाज आहे. तत्कालीन काळात जेव्हा समाज दुभंगला होता. विषमता होती, एकविचारांची मानसिकता नव्हती, त्या काळात महानुभाव पंथाचे सर्वज्ञ चक्रधरस्वामी यांनी समाज एकत्रीकरणाचे काम केले. अटकेपार चांगला विचार, मानवतेची मूल्ये देण्याचे काम महानुभाव पंथाद्वारे झाले. आतापर्यंत सरकारने या समाजाकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे त्यांच्या मागण्यांचा अनुशेष वाढला आता हा वनवास संपल्याचे नमूद केले.

मराठी विद्यापीठाच्या उभारणीत अनेक ठिकाणांचा प्रस्ताव होता. विद्यापीठासाठी समितीने दिलेला अहवाल बाहेर काढला. कुलगुरू पदासाठी वाद होता, तोही संपुष्टात आणल्याचे सांगून आद्य ग्रंथ जिथे लिहिला गेला त्याच नगरीत रिद्धपूरला मराठीचे विद्यापीठ उभारणार, असे तेव्हा ठणकावून सांगितले, असेही फडणवीस म्हणाले.

महानुभाव पंथीय साहित्याचे डिजिटायझेशन

नोव्हेंबरमध्ये निवडणुका आहेत. त्यामध्ये विजयी होऊ असा विश्वास व्यक्त करून महानुभाव पंथीयांची कामे डिसेंबरमध्ये पुरवणी मागणीत व उर्वरित राज्याच्या अर्थसंकल्पात पूर्ण करण्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली. विद्यापीठाच्या माध्यमातून मराठीतील महानुभाव पंथीय साहित्याचे डिजिटायझेशन करणे आणि हा अमूल्य ठेवा सुरक्षित वैश्विक करण्यावर भर राहील असेही ते म्हणाले.

'तुतारी'ची सोबत अन‌् सभागृहात हशा...

विद्यापीठ उभारणीत समाजातील महंतांची तुतारी आपल्यासोबत राहिली, तर येत्या पाच वर्षांत रिद्धपूर येथे जागतिक दर्जाचे मराठी विद्यापीठ उभारू यासाठी पुन्हा एकदा याच सरकारला निवडून द्या असे अप्रत्यक्षपणे सांगून फडणवीस यांनी निवडणुकीत साथ देण्याची विनंती केली. मात्र ही 'तुतारी' पवारसाहेबांची नव्हे, तर आपल्या सहकार्याची तुतारी फुंकत ठेवा अशी पुष्टी त्यांनी जोडताच सभागृहात एकच हशा पिकला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news