Nashik | ॲम्पी थिएटर धूळ खात, टवाळखोरांची नाटकं दणक्यात

एकीकडे नाट्य परिषदेचा कलाजागर अन् दुसरीकडे रंगकर्मींचे वास्तूकडे कानाडोळा
Ampy Theatre
पंचवटी : मनपाच्या उद्यान विभागाकडून तपोवनातील रामसृष्टी येथे उभारण्यात आलेल्या ॲम्पी थिएटरची झालेली दुरवस्था. (छाया : गणेश बोडके)

पंचवटी (नाशिक) : गणेश बोडके

पंचवटी विभागातील एकूण सहा प्रभागांतील उद्यानांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सहा ठिकाणी ॲम्पी थिएटर उभारण्यात आलेले होते. परंतु तेथे कोणतेही कार्यक्रम होत नसल्याने ते वापराविना बंद आहेत. उदंड झालेले ॲम्पी थिएटर कोटयवधी रुपये खर्च करूनदेखील धूळ खात पडून आहेत. या थिएटरांचा ताबा टवाळखोरांनी घेतला असून, तेथे रात्री मद्याच्या पाट्र्यांची नाटकं झोकात सुरू आहेत.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने १०० व्या नाट्य संमेलनानिमित्त नाट्य कलेचा जागर नाशिकमध्ये होत आहे. नाशिकमध्ये कोट्यवधी रुपये खर्चून ॲम्पी थिएटर उभारल्याचा जागर मात्र रंगकर्मींपर्यंत पोहोचलेला नाही, ही मनपाच्या दृष्टीने शोकांतिका आहे.

एकट्या पंचवटीत १०५ उद्याने असून त्यात अमृत वन, राम सृष्टी, थीम पार्क ही उद्याने पाच एकरांपेक्षा मोठ्या जागेत विकसित करण्यात आलेली आहेत. गोदाकाठावरील कुसुमाग्रज उद्यान आणि नवीन आडगाव नाका परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक यांच्यातही ॲम्पी थिएटर तयार करण्यात आलेले आहे. या उद्यानात शेकडोंच्या संख्येने प्रेक्षक बसू शकतील अशी व्यवस्था आहे. अशा मोकळ्या जागेत कार्यक्रम सादर करण्याची अद्याप कुणी फारशी तयारी दर्शविली नाही. त्यामुळे कोट्यवधी खर्चून उभारलेल्या ॲम्पी थिएटरचा खर्च वाया गेल्याचे दिसून येत आहे.

Ampy Theatre
मंचावरील तसेच प्रेक्षकांच्या बसण्याच्या जागेवरील फरशा तुटून, निखळून पडल्या आहेत. (छाया : गणेश बोडके)

गेले तडे, तुटल्या फरशा

वापराअभावी ॲम्पी थिएटरच्या बांधकामाला तडे गेलेले असून, मंचावरील तसेच प्रेक्षकांच्या बसण्याच्या जागेवरील फरशा तुटून, निखळून पडल्या आहेत. मध्यंतरी तपोवनातील राम सृष्टी उद्यानातील ॲम्पी थिएटरच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. तर त्याच्या निखळलेल्या फरशा काढण्यात आल्या होत्या. तवली डोंगरावरील अमृत वन उद्यानातील ॲम्पी थिएटरही अशीच अवस्था आहे.

रंगकर्मींकडून पाठ

सांस्कृतिक चळवळ वाढण्यासाठी ॲम्पी थिएटरची निर्मिती करण्यात आली होती. मात्र तशी चळवळ उभी राहिली नाही व त्याच्या वापराबाबच कुठेही प्रयत्न होत नसल्याचे दिसते. नाटकाच्या तालिमीसाठी जागा उपलब्ध होत नसल्याची तक्रारी रंगकर्मींकडून सातत्याने केली जाते. मात्र प्रत्यक्षात हक्काच्या जागेचा त्यांना विसर पडला आहे. वापराविना थिएटरांची दुरवस्था झाली आहे.

"पंचवटीत हे आहेत ॲम्पी थिएटर"

गोदाकाठावरील कुसुमाग्रज उद्यान, नवीन आडगाव नाका येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, तपोवनातील रामसृष्टी उद्यान, मखमलाबादच्या तवली डोंगरावरील अमृतवन उद्यान, हिरावाडी स्नेहनगरमधील थीम पार्क, रामवाडीजवळील स्मार्ट सिटी अंतर्गत उभारलेला गोदा पार्क.

महापालिकेच्या माध्यमातून ॲम्पी थिएटरची उभारणी केलेली आहे. अनेकांना नाशिकमध्ये ॲम्पी थिएटर बनविण्यात आलेले आहे ही गोष्टच माहिती नाही. तसेच ॲम्पी थिएटर उभारताना ते कशा पद्धतीने हवे. कार्यक्रमासाठी किती जागा लागते व त्याची उभारणी नक्की कशी असावी याबाबत महापालिकेने रंगकर्मींना विश्वासात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे थिएटरचा वापर वाढू शकेल.

नंदन दीक्षित, निर्माते, दिग्दर्शक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news