

नाशिक : पेठ रोडवरील फुलेनगर परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत २३ वर्षीय क्षयरोग बाधिताचा मृत्यू झाला. डीजेच्या आवाजामुळे या तरुणाचा मृत्यू झाल्याचा दावा सुरुवातीस करण्यात येत होता. मात्र शवविच्छेदन अहवालानुसार, तरुणास क्षयरोग होता. तसेच तेथे फटाके फोडल्यानंतर धुरामुळे तरुणास श्वसनाचा त्रास झाल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
फुलेनगर येथील ओमकारबाबा नगर परिसरात डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त डीजे लावण्यात आला होता. रविवारी (दि.१३) सायंकाळी ७.३० वाजता फुलेनगर तीन पुतळा परिसरात डीजे सुरू होता. त्या ठिकाणी परिसरातील नितीन फकिरा रणशिंगे (२३) हा युवक उभा होता. डीजेचा आवाज वाढल्यानंतर नितीन यास त्रास जाणवू लागला. त्यामुळे तो अचानक खाली कोसळला. त्यावेळी त्याच्या तोंडातून व नाकातून रक्त आले. नातलगांनी त्यास तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच नितीनचा मृत्यू झाला होता.
डीजेच्या आवाजामुळे नितीनचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात होता. मात्र शवविच्छेदन अहवालानुसार नितीनला क्षयरोगाची लागण असल्याचे निष्पन्न झाले. त्यातच डीजे सुरू असताना फटाके फोडल्यानंतर त्याचा धूर झाल्याने त्यास श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नितीनचा मृत्यू झाला. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
डीजेच्या आवाजामुळे रुग्णांना त्रास जाणवत असल्याच्या तक्रारी नेहमी केल्या जातात. त्यातच हृदयविकाराच्या रुग्णांना याचा सर्वाधिक त्रास होत असल्याचे बोलले जाते. डीजेच्या आवाजाच्या कंपनांनी हृदयावर आघात होण्याची शक्यता कित्येक पटीने वाढते. शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळी लहान मुलाचा मृत्यू झाल्याची घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती. या मुलासही हृदयविकार असल्याचे समोर आले होते.
डीजे वाजवण्यास बंदी असतानाही सार्वजनिक मंडळांकडून अनेक सण-उत्सव, जयंतीस डीजे वाजवला जात असतो. त्यातही आवाजाच्या मर्यादेचे पालन होत नसल्याने मिरवणुका, कार्यक्रम पाहण्यासाठी येणाऱ्यांसह लहान मुलांना त्रास होत असतो. त्यातच मिरवणुकीतील लेझर लाइटमुळे गतवेळी काही जणांच्या डोळ्यांना इजा झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तरीदेखील नियमांचे उल्लंघन करीत डीजे व लेझर लाइटचा वापर सर्रास होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.