

नाशिक : थंड हवेचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये मार्चच्या प्रारंभीच तापमान ३७ अंशांवर पोहोचल्याने उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाली आहे. महिना अखेरपर्यंत तापमान ४० अंशांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाढत्या उष्णतेमुळे आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता असल्याने, नागरिकांनी आवश्यक सावधगिरी बाळगावी, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.
सध्या राज्यभर तीव्र उष्णतेची लाट पसरली असून, अनेक शहरांमध्ये कमाल तापमान ४० अंशांपर्यंत पोहोचले आहे. राज्यातील सरासरी तापमान ३८ ते ३९ अंशांवर गेल्याने, पुढील ४८ तासांत उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
नाशिकमध्येही तापमान सतत वाढत असून, उष्णतेच्या झळांनी नागरिक हैराण झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी तापमानात काहीशी घसरण झाली होती. निफाडमध्ये पारा तब्बल ४.२ अंशांपर्यंत खाली गेल्याने, दिवसा तीव्र उन्हाचा त्रास आणि पहाटे गारवा असे विरोधाभासी हवामान अनुभवायला मिळाले.
सध्या तापमान पुन्हा वाढत असल्याने, दुपारच्या वेळी शहरातील प्रमुख रस्ते ओस पडत आहेत. उष्णतेच्या झळा अधिक तीव्र होत असल्याने, नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट दिला आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात सरासरी पाऊस कमी पडल्याने आणि थंडीही कमी झाल्याने, यंदा मार्चमध्येच उष्णतेची लाट सक्रिय झाली आहे. बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे येत असल्याने, कोकण आणि गोवा किनारपट्टीवर तापमानाचा निर्देशांक उच्च पातळीवर आहे. येत्या काही दिवसांत उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
स्वत:ला हायड्रेटेड ठेवावे.
किमान दोन लिटर पाणी प्यावे.
नारळपाणी, लिंबूपाणी, ज्यूस यांचे सेवन करावे.
घराबाहेर जाताना टोपी, ओढणी, रुमाल वापरावे.
गडद रंगाचे कपडे परिधान करणे टाळावे.
हलके, सैल आरामदायी कपडे परिधान करावे.
पचायला हलके पदार्थ खावे, सनस्क्रीन लावावे.