

नाशिक : सलग तिसऱ्या दिवशी निफाड तसेच नाशिक राज्यात थंड शहर ठरले आहे. निफाडला बुधवारी (दि. १३) यंदाच्या हंगामातील सर्वात निच्चांकी ११.९ अंश तापमानाची नोंद झाली. नाशिकमध्येही पारा १३.४ अंशांवर स्थिरावला. वाढत्या थंडीच्या कडाक्यामुळे नागरिक गारठून गेले आहे.
हिमालयामध्ये होणाऱ्या बर्फवृष्टीचा परिणाम जिल्ह्याच्या तापमानावर होत आहे. सलग तीन दिवसांपासून तापमानाच्या पाऱ्यात घट होत आहे. त्यामुळे शहर व परिसरात थंडीचा कडाका जाणवत आहे. पहाटे व रात्रीच्या वेळी हवेत गारवा अधिक असल्याने शहरवासीय गारठून जात आहेत. त्यामुळे थंडीपासून बचावासाठी नागरिक उबदार कपड्यांची मदत घेत असून, शेकोट्यांभाेवती गर्दी होत आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पाऱ्यातील घसरण कायम आहे. निफाडला पारा १२ अंशाखाली आल्याने तालुक्याला हुडहुडी भरली आहे. गव्हासाठी हे वातावरण पोषक असले तरी द्राक्षबागांसाठी ते धोकेदायक असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. दरम्यान, अन्यही तालुक्यात थंडीचा जोर वाढत आहे. येत्याकाळात पाऱ्यात अधिक घसरण होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.