Nashik Teachers Constituency|मतदान केंद्राबाहेरच मतदारांना पैसे वाटप

संशयितास पोलिसांनी पकडले
Nashik Teachers Constituency
नाशिकमध्ये मतदान केंद्राबाहेरच मतदारांना पैसे वाटप File Photo

नाशिक : विधान परिषेदच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीतील मतदानावेळी शहरातील बी. डी. भालेकर शाळा मतदान केंद्रालगत मतदारांना पैसे वाटप करणाऱ्या संशयितास पोलिसांनी पकडले आहे. विलास बाळू नरवडे (४०, रा. पळसे) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून ६९ हजार पाचशे रुपये जप्त करण्यात आले आहे.

भद्रकाली पोलिस ठाण्यातील अंमलदार योगेश माळी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित विलास नरवडे हा शालिमार येथील बी. डी. भालेकर शाळेच्या मतदान केंद्राबाहेर उमेदवार किशोर दराडे यांच्या बुथच्या पाठीमागील बाजुस उभा राहून मतदारांना पैसे वाटप करत असल्याचे आढळून आला. एका विशिष्ट उमेदवारालाच मतदान करण्यासाठी बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास विलास हा मतदारांना पैसे वाटप करत असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. अंगझडतीत त्याच्याकडे ६९ हजार ५०० रुपयांची रोकड आढळून आली. त्यामुळे त्याच्याविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात भ्रष्टाचारी कृत्यासाठी व आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी लोकप्रतिनिधी कायद्यासह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भद्रकालीचे सहायक पोलिस निरीक्षक वसंत पवार याप्रकरणी तपास करीत आहेत.

याआधीही रोकड जप्त

विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या प्रचारातही पैसे वाटप व मतदारांना अनेक आमीष दाखविल्याचे प्रकार उघड झाले व आरोप झाले. मतदानापूर्वी मनमाडमध्येही पैसे वाटणाऱ्यास ताब्यात घेण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news