

सुरगाणा (नाशिक) : बाऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंश तस्करांनी धुमाकूळ माजवला आहे, गोवंश जनावरांची अवैध वाहतूक सुरु असून कत्तलीच्या उद्देशाने गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्या तस्करांना पोलीस प्रशासनाचा कोणताही धाक नसल्याचे समोर येत आहे.
देशी गायींचे संगोपन, संवर्धन आणि पालनपोषण करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी देशी गायीला राज्यमाता-गोमाता घोषित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्याच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास विभागाने या संबंधीचा शासन निर्णय सोमवार, दि. 30 सप्टेंबर 2024 रोजी जारी केला. भारतीय संस्कृतीतील गायीचे अनन्यसाधारण महत्त्व पाहता गायीला विशेष दर्जा देण्यात आलेला असतानाही पोलीस ठाण्याच्या हद्दीतूनच अवैध गोवंश वाहतुक सुरु असल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
गोवंश तस्करांकडून रात्रीच्यावेळी बेधडकपणे अवैध धंदे सुरु असून गोवंशाची अवैधपणे वाहतूक केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी दखल घेत पेट्रोलिंग, भरारी पथके कार्यरत ठेवली आहेत. गोवंशाची अवैध वाहतूक हा गोरख धंदा करणाऱ्यांवर आळा बसण्यासाठी गोवंश संरक्षक कार्यकर्ते भुषण रहाणे पाटील, राजेंद्र निकुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ग्रामीण भागातील जनतेची दिशाभूल न करता पोलिसांनी याप्रकरणी कठोर पावले उचलण्याची मागणी सखल हिंदू समाजाच्यावतीने करण्यात येत आहे. तालुक्यातील अनेक गावांतून दररोज अवैध गोवंश वाहतूक होत असून त्याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष पुरवण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. गुजरात खडकी - करंजुल (पे) - ठाणगाव - बेडसे - जांभुळपाडा - मोधळपाडा - कळमणे - जाहुले - चिकाडी - मोखनळ - बोरवण - भनवड - वणी मार्गे नाशिक, उंबरठाण - वांगण (सु) - पळसन - मनखेड - ओरंभे - भनवड मार्गे नाशिक सारख्या मोठ्या शहरांकडे गोवंशाची अवैध तस्करी होत असून अवैध गोवंश तस्करी रात्रीच्या वेळी पिकअप सारख्या वाहनांमधून होत असल्याने या गावांतील नागरिकांकडून पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.