

येवला (नाशिक) : बुद्ध - आंबेडकरी सामाजिक प्रबोधन, लोककला क्षेत्रातील कार्याचा गौरव करण्यासाठी दिल्या जाणारा राज्य सांस्कृतिक पुरस्कार यापुढे 'लोककवी वामनदादा कर्डक' या नावाने देण्यात येणार आहे. याबाबत लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानने शासनाकडे मागणी केली होती. या निर्णयाचे लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानचे संस्थापक कार्याध्यक्ष प्रा. शरद शेजवळ व आंबेडकरी लोककलावंतांनी स्वागत केले आहे. या संदर्भात सांस्कृतिक कार्य विभागाने दि. २७ नोव्हेंबरला शासन निर्णय जारी केला आहे.
लोककलेला योग्य प्रतिष्ठा
राज्यातील लोककला परंपरेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलावंतांना सन्मानित करण्यासाठी राज्य सरकार दरवर्षी सांस्कृतिक पुरस्कार प्रदान करते. या पुरस्काराला मान्यवर व्यक्तिमत्त्वाचे नाव देण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता. महाराष्ट्रातील लोककला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची लोकाभिमुख मांडणी त्यांनी जनमानसात पोहोचवली. सशक्त शब्दांकन, धारदार आशय आणि लोकभाषेतील ओघवती शैली ही वामनदादांच्या काव्यशैलीची वैशिष्ट्ये मानली जातात. त्यांच्या गीत आणि पोवाड्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रवाहावर कायमस्वरूपी छाप पाडली आहे. लोककवी डॉ. वामनदादा कर्डक यांचे साहित्य शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ स्तरावरून शिकवले जावे, अशी मागणी प्रतिष्ठानचे संस्थापक कार्याध्यक्ष शरद शेजवळ यांनी केली आहे.