

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी एसटी महामंडळाने एक मोठा निर्णय घेण्याचे नियोजन केले आहे. निमाणी बसस्थानक परिसरात होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी येथील ४०० बस फेऱ्या तपोवनातील सिटीलिंक बस डेपोतून सुरू करण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
द्वारकावरील अंडरपासच्या कामामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल झाले आहेत. सध्या मेळा आणि सीबीएस येथून सुटणाऱ्या बसेस पंचवटीतील निमाणी बसस्थानकातून सोडल्या जात आहेत. रस्ते अरुंद असल्याने तिथे एसटी बसेसची प्रचंड गर्दी होऊन रोज वाहतूक कोंडी होत आहे.
ती कोंडी सोडवण्यासाठी तत्कालिक उपाय म्हणून एसटी प्रशासनाने तपोवन आगार हा नवा पर्याय निवडला आहे. धुळे, जळगाव व नंदुरबार वगळता, इतर मार्गावरील बसेस तपोवनमधून सोडण्याचे महामंडळाच्या विचारधीन आहे. अधिकारी स्तरावर त्याबाबत नियोजन सुरू झाले आहे.
प्रवाशांची गैरसोय होणार वाहतूक कोंडी
फोडण्यासाठी वाहतूक बदल महत्त्वाचे आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, येवला, विंचूर, निफाडकडे जाणाऱ्या नागरिकांना आता शहरातून थेट तपोवन गाठावे लागणार आहे. प्रवाशांना रिक्षाने बसस्थानकापर्यंत जावे लागेल. त्यामुळे जास्तीचा वेळ आणि पैसा खर्च होणार असल्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी उमटत आहेत.