सप्तश्रृंगगड : नाशिक कनाशी या मार्गावरील राज्य परिवहनच्या बसला नांदुरी अभोणा या मार्गावर मंगळवार (दि.20) रोजी दुपारी साडेबारा वाजता अभोणा दरम्यान अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
त्याबाबत सविस्तर असे की, नाशिकहून अभोणा कनाशीच्या दिशेने निघालेली एसटी बस क्रमांक MH 14 BT 4529 या कळवण आगाराच्या बसला नांदुरी अभोणा मार्गावरील कातळगाव फाटा नजीक अभोणा दिशेकडून नांदुरीकडे जात असलेली दुचाकी समोरुन भरधाव येत असल्याचे बस चालक पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी एसटी बस रस्त्याच्या कडेला घेतली. मात्र पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने व साईट पट्ट्या ढासळल्याने बसचा तोल गेला आणि बस रस्त्याच्या कडेला खड्ड्यात कलंडली. बस चालक पाटील व वाहक बागुल यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवत बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्याने संभाव्य मोठा अनर्थ टळला आहे. दुचाकीस्वार मात्र फरार झाला आहे.
अपघातात कुणालाही हानी झाली नसून सर्व प्रवाशांना कळवण आगारातून दुसरी एसटी बस बोलवून पुढे मार्गस्थ करण्यात आले आहे. बस मध्ये एकूण 75 प्रवासी असल्याचे सांगण्यात आले आहे. अपघात स्थळी ये-जा करणाऱ्या वाहन चालकांनी गर्दी झाली. अपघात ग्रस्त बसला क्रेनच्या साह्याने काढण्याचे काम सुरु आहे. स्थानिक नागरिक रवींद्र भुसारे यांनी काही साथीदारांच्या मदतीने बसचालकाला सहकार्य केले.
अभोणा नांदुरी रस्त्यावर चिंचबारी येथे काही ठिकाणी पावसामुळे दरड कोसळून रस्त्यावर मलबा साचला आहे. आभोणा रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो परंतु रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था झाली असून रस्त्यावरील साचलेला मलबा तरी लवकरात लवकर काढण्यात यावा जेणेकरून मार्गावर होणारे अपघात टाळता येतील अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.