Nashik news | चित्रकथी जातपंचायत अखेर रद्द

आंतरजातीय विवाहास मान्यता, वाळीत टाकण्यास प्रतिबंध
Nashik news | चित्रकथी जातपंचायत अखेर रद्द
Published on
Updated on

नाशिक : महाराष्ट्र जातपंचायतीसारख्या अनिष्ट रूढी, परंपरा सुरूच असून, आणखी एका समाजातील जातपंचायत रद्द करण्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला यश आले आहे. शुक्रवारी (दि. २०) नाशिकमध्ये राज्यातील चित्रकथी जातपंचायत बरखास्त करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र अंनिसचे जातपंचायत मूठमाती अभियान व भटका शोषित समुदाय संघर्ष संघटना यांच्या संयुक्त प्रयत्नांना हे यश आले आहे. राज्यभरातून आलेल्या चित्रकथी समाजबांधव, भटके-विमुक्त समाज बांधवांनी हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे जातपंचायत बरखास्त करण्याबरोबरच आंतरजातीय विवाहास मान्यतादेखील देण्यात आली आहे. बालविवाहास बंदी घालण्यात आली. वाळीत टाकणे, दंड करणे यावर प्रतिबंध करण्यात आला. बहिष्कृत कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. हुतात्मा स्मारक येथे झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन संविधान प्रस्ताविका वाचनाने झाले. या प्रक्रियेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महत्त्वाची भूमिका निभावली.

कृष्णा चांदगुडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. टी. आर. गोरणे यांनी आभार मानले. यावेळी कोमल वरदे, मनीषा अटक, जगदीश चित्रकथी, प्रवीण शिंदे, गणेश चित्रकथी, विनोद शिंदे, निंबा जाधव, गोपीचंद इंगळे आदी उपस्थित होते.

पाच वर्षांनंतर 'ती' जाणार माहेरी

एका महिलेने आंतरजातीय विवाह केल्याने तिला समाजातून बहिष्कृत करण्यात आले होते. त्यामुळे तिला गेल्या पाच वर्षांपासून आपल्या माहेरी तसेच समाजात जाता येत नव्हते. ती महिला यावेळी उपस्थित होती. दरम्यान, या निर्णयामुळे तिला पुढील आठवड्यात होणाऱ्या तिच्या भावाच्या लग्नाला उपस्थित राहता येणार असल्याने, तिने आनंद व्यक्त केला.

"जातपंचायत संविधान विरोधी (अ)न्याय व्यवस्था आहे. जातपंचायत बरखास्त झाल्याने लोकशाही बळकट होण्यास मदत होईल. सर्वांचे अभिनंदन करतो व आभार मानतो."

— कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, जातपंचायत मूठमाती अभियान

"अंनिसच्या जातपंचायत मूठमाती अभियानाला आम्ही पाठिंबा देत आहोत. म्हणून आम्ही पुरोगामी निर्णय घेतले आहे. येणाऱ्या काळात आम्ही समाज प्रबोधनाची कामे सोबत करणार आहोत."

— जगदीश चित्रकथी, पदाधिकारी, चित्रकथी समाज

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news